नागपूर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत दावा केला आहे की, “हनीट्रॅपच्या प्रकरणामुळेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि सत्तांतर झाले.” वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
शिंदेंच्या सीडीमुळे सत्तांतर?
वडेट्टीवार म्हणाले, “नाशिक प्रकरणाशी संबंधित एकनाथ शिंदे यांची सीडी होती आणि याचमुळे सत्तापालट झाला. ही एक फार मोठी बाब आहे. योग्य वेळ आल्यावर आम्ही ती दाखवू.” त्यांनी सूचित केले की, या प्रकरणात अनेक वरिष्ठ अधिकारी, आयएएस अधिकारी आणि माजी अधिकारी सामील आहेत.
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणतात हनीट्रॅप वगैरे काही नाही. पण सत्य वेगळं आहे. सरकार आणि विरोधक दोघांकडेही यासंदर्भात महत्त्वाची माहिती आहे. मात्र, कोणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावण्याचा अधिकार आम्हाला नाही, म्हणून आम्ही शांत आहोत.”
सीडी पाहण्यासाठी लागेल खास निमंत्रण-
वडेट्टीवार म्हणाले, “या प्रकरणाचे पुरावे इतके ठोस आहेत की, जेव्हा आम्ही ते दाखवू, तेव्हा ते पाहण्यासाठी लोकांना १०-२० हजार रुपयांचे तिकीट काढावे लागेल. ती माहिती सर्वसामान्यांसाठी नसेल, फक्त खास निमंत्रितांसाठी असेल.”
नाना पटोले यांच्या विधानानंतर गोंधळ-
गुरुवारीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत आरोप केला होता की मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहेत. यावेळी त्यांनी एक पेनड्राइव्हही सभागृहात दाखवली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावत त्याची थट्टा केली होती. “नाना पटोले यांचा बॉम्ब आम्हा पर्यंत पोहोचलाच नाही,” असे म्हणत मुख्यमंत्री हसले होते.
लोकसभा विजयाचं डोक्यावर चढलेलं माज-
विधानसभा निवडणुकीतील अपयशावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाष्याचे समर्थन करत विजय वडेट्टीवार म्हणाले, “भारत आघाडीला लोकसभेतील यशानंतर इतका आत्मविश्वास आला की, आम्ही सगळ्या जागा जिंकू, असे प्रत्येकाला वाटू लागले. त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या तयारीत ४० दिवस वाया घालवले.
ते म्हणाले, २८ ते ३० बैठका झाल्या, मात्र ठोस रणनीती आखता आली नाही. प्रत्येक पक्ष आपल्या खिशात अधिक जागा टाकण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे मोठा फटका बसला, हे उद्धव ठाकरे बरोबरच सांगत आहेत.