नागपूर : महाराष्ट्र सरकारने नागपूर आणि ठाणे येथील ऐतिहासिक तुरुंगांना शहराबाहेर स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब करत दोन्ही शहरांच्या कारागृह व्यवस्थेत मोठा बदल घडवण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर सेंट्रल जेलला खापरखेडा येथील चिंचोली गावाच्या परिसरात हलविण्यात येणार असून, यासाठी सुमारे ८० एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे, ठाणेतील ऐतिहासिक तुरुंग संरक्षित ठेवून ते संग्रहालयात रूपांतरित करण्याचा प्रस्ताव आहे.
या निर्णयामागे शहरांचे सौंदर्यीकरण, तसेच जेल व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि कार्यक्षम नियोजन हा मुख्य उद्देश आहे. नागपूरमधील सध्याच्या तुरुंगाच्या जागेवर स्मार्ट सिटी व पर्यटनाशी संबंधित प्रकल्प राबवले जाणार आहेत. यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेने असा प्रस्ताव सादर केला आहे की, मूळ वास्तुशैलीमध्ये कोणताही मोठा बदल न करता जेल परिसर संग्रहालय म्हणून जतन केला जावा, जेणेकरून तेथील ऐतिहासिक वारसा जपला जाईल.
या प्रस्तावाला आता गृह विभागाने राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. एकदा अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या दोन्ही प्रकल्पांवर प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच नागपूर आणि ठाण्याचे तुरुंग फक्त आपले ठिकाणच नव्हे, तर आपली ओळख आणि उद्देशही बदलणार आहेत.