| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Feb 4th, 2018

  नागपुरातील नव्या बाजारांत बचत गटांना २५० दुकाने – नितीन गडकरी

  नागपूर: नागपूर शहरात उत्तम उद्याने, खेळ मैदाने, स्मशानभूमी आणि बाजार तयार व्हावे हे आपले स्वप्न आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या बाजारांच्या जागेवर लवकरच सर्व सोयींनीयुक्त अत्याधुनिक बाजार तयार होतील, त्याची प्रक्रिया सुरू आहे. या बाजारांमध्ये महिला बचतगटांच्या सुमारे २५० दुकाने महापौरांनी उपलब्ध करून द्यावेत. यासाठी आवश्यक ते सहकार्य आम्ही करू असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

  नागपूर महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण विभाग, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजिविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. विशेष अतिथी म्हणून खासदार रूपा गांगुली उपस्थित होत्या. व्यासपीठावर पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख, दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, आयुक्त अश्विन मुदगल, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, उपसभापती श्रद्धा पाठक, समिती सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, हनुमानगर झोन सभापती भगवान मेंढे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सुनील हिरणवार, नगरसेविका चेतना टांक, शीतल कामडे, उषा पॅलट, नगरसेवक सतीश होले, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे प्रामुख्याने उपस्थित होते.

  पुढे बोलताना ना.नितीन गडकरी म्हणाले, महिला बचत गटांच्या उत्पादनांना मार्केट मिळवून देण्याच्या दृष्टीने असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात. उद्योगासाठी प्रेरणा देतात. या क्षेत्रात काम करताना महिलांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. चांगले काम, खरे बोलणे आणि उत्पादनाची गुणवत्ता हे कुठल्याही व्यवसायासाठी आवश्यक असतात, असे म्हणत त्यांनी मेळाव्यासाठी आयोजक आणि सहभागी बचतगटांच्या शुभेच्छा दिल्या.

  खासदार रूपा गांगुली म्हणाल्या, महिला आणि नागरिकांना सामाजिक सन्मान मिळायलाच हवा. घरोघरी शौचालय बांधण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडला. त्याला मूर्तस्वरूप दिले आणि पहिल्यांदा महिलांना सामाजिक सन्मान प्राप्त झाला. उद्योग क्षेत्रातच नव्हेतर आता प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर होत आहेत. ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे. नागपूर शहरात नितीन गडकरी यांच्यासारखे भातृतुल्य नेतृत्व लाभणे हा नागपूरचा सन्मान आहे, या शब्दात त्यांनी गडकरी यांचा गौरव केला.

  अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महिला उद्योजिका राष्ट्रनिर्माणासाठी मदत करते. घरात जर उद्योजिका असली तर घरातील बालकांवर आपसूकच चांगले संस्कार घडतात. नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेले त्या मेळाव्यासाठी सात दिवस पुरेसे नाही. महिला बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण मिळावे यासाठी कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र आणि बाजरपेठ मिळावे यासाठी कायमस्वरूपी बाजार व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यासाठी राज्य शासनाची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  तत्त्पूर्वी दीपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. प्रास्ताविकातून महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे यांनी मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रथमच विदर्भस्तरावर उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून विविध उत्पादनांचे ३०० स्टॉलस लागले आहेत. यावेळी खासदार रूपा गांगुली यांचा आयोजकांच्यावतीने सभापती वर्षा ठाकरे यांनी साडीचोळी व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. नामदार नितीन गडकरी व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रेणूका देशकर यांनी केले. आभार समिती सदस्या दिव्या धुरडे यांनी मानले. कार्यक्रमाला मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कर्तृत्ववान महिला व खेळाडूंचा गौरव

  नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या इतिहासात प्रथमच कर्तृत्ववाने महिलांचा व शहरातील खेळाडूंचा नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला सत्कारमूर्तींमध्ये सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा वाघमारे, महिला क्रिकेट संघातील खेळाडू मोना मेश्राम, कृषी कीटकतज्ज्ञ संगिता सव्वालाखे, बॅंकिग क्षेत्रातील नीलिमा बावणे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे, स्कूल व्हॅन चालक तनुजा अरबाज खान, अनसूया बचत गटाच्या रेखा कामडे, लता धकाते, तारा बावणे, पाककला विशारद अपर्णा कोलारकर, वैद्यकीय साहित्य तयार करणा-या शिल्पा गणवीर, मुलांना घडवणारी आई चंद्रकला चिकाणे, मूक बधीर शाळेच्या आदर्श शिक्षिका मीनल सांगोळे यांचा समावेश होता. तर सत्कारमूर्ती खेळाडूंमध्ये बुद्धीबळपटू दिव्या देशमुख, रौनक साधवानी, मृदूल डेहनकर, बॅडमिंटनपटू ऋतिका ठक्कर, खो-खो पटू राहुल सहारे, कराटेपटू साक्षी साहू, रेजू कुशवाह, देशज वैष्णव, दिलीप कावरे, सायकलपटू रजनी राऊत, रामायण स्पर्धेत अव्वल येणार अरबाज पप्पू कुरेशी, हॉकीपटू तौफिक अहमद, शहनाज खान, अथलेट अहफाज खान, बॅडमिंटनपटू सौरभ ईन्हानकर आणि आगीतून एकाचे प्राण वाचविणारा अविनाश शेंडे यांचा समावेश होता.

  महाराष्ट्रीय लोककलेची सांस्कृतिक मेजवानी

  उद्घाटनसमारंभानंतर महाराष्ट्राच्या लोककलेची ओळख करून देणा-या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी रसिकांनी देण्यात आली. नांदी आणि गणेशस्तवनाने सुरूवात झालेल्या कार्यक्रमात ओवी, भूपाळी, जोगवा, गोंधळ, लावणी, कोळीनृत्य, गवळण आदी लोककलांच्या सादरीकरणाने रंगत आणली. सोमवारी ५ फेब्रुवारी सांयकाळी ६.३० वाजता राजेश चिटणवीस प्रस्तुत “घटकाभर बसा आणि पोटभर हसा” या विनोदी स्कीटचे सादरीकरण आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145