
ढाका – बांगलादेशच्या राजकारणात भूचाल घडवणारा निर्णय सोमवारी समोर आला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कठोर कारवाईत तब्बल १४०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं.
या प्रकरणात न्यायालयाने म्हटलं आहे की, आंदोलन दडपण्यासाठी सुरक्षा दलांनी अत्यंत क्रूर पद्धतीने कारवाई केली आणि यामागे थेट हसीना यांचीच भूमिका होती. ड्रोन, हेलिकॉप्टर आणि घातक शस्त्रांचा वापर करून आंदोलनकर्त्यांना लक्ष्य केल्याचा आरोपही सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.
निकालाच्या वेळी शेख हसीना स्वतः न्यायालयात हजर नव्हत्या. २०२४ मधील राजकीय अस्थिरतेदरम्यान त्यांनी भारतात आश्रय घेतल्याने त्यांच्यावरचा खटला अनुपस्थितीत चालवण्यात आला. निकाल जाहीर होताच ढाक्यात सुरक्षा कडक करण्यात आली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हसीना समर्थकांनी या निर्णयाला “सूडकृत्य” म्हटले असून न्यायालयावर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला आहे. तर विरोधकांनी हा “देशातील लोकशाहीवरील अत्याचारांचा शेवट” असल्याचे म्हटले आहे.या शिक्षेमुळे बांगलादेशच्या सध्याच्या आणि आगामी राजकारणावर मोठा परिणाम होणार असून देशात आणखी अस्थिरता निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.










