मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांनी आपल्या ९ आमदारांना सोबत घेत भाजप-शिंदे सरकारसोबत हातमिळवणी केली. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही या ठिकाणी पोहचले आहेत. आम्ही शरद पवारांना भेटण्यासाठी आलो आहोत. पुढे ते काय निर्णय घेतात त्यांचे पुढचे नियोजन कसं असेल हा आमच्या भेटीचा उद्देश आहे. शरद पवार यांचं मार्गदर्शन अपेक्षित आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच आहेत. अजित पवार काय म्हणतात त्या गोष्टीला फारसे महत्त्व नाही असेही नाना पटोले म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करते? हे स्वतःच अजित पवार यांनी सांगितले आहे. शरद पवार हेच नाव त्यांनी घेतले. अजित पवारांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लक्षात घेऊन बोलावे असा सल्लाही नाना पटोलेंनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला. शेड्युल १० प्रमाणे ज्या तरतुदी आहेत त्याचाच उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने केला. शरद पवार हेच राष्ट्रवादीचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचाच आदेश चालणार, अजित पवार यांच्या बोलण्याला कोणीच महत्त्व देणार नाही.
तसेच विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस दावा करणार का? असा प्रश्नही नाना पटोले यांना विचारण्यात आला. आम्ही काय भूमिका घ्यायची ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करुनच निर्णय घेऊ. ज्यांचे आमदार जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता असतो. तरीही आम्ही ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सध्या यासंदर्भात आम्ही कोणताच निर्णय घेतलेला नाही. तसेच पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावरही सडकून टीका केली. प्रफुल्ल पटेल यांनी जो काही गौप्यस्फोट केला ते मोदी आणि शाह यांनी लिहून दिलेलं स्क्रिप्ट आहे. ते तसे बोलले नाहीत तर त्यांना तुरुंगात जावं लागेल असा घणाघात नाना पटोले यांनी केला.