मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती बिघडली आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील कार्यक्रमादरम्यान भाषणात त्यांना वारंवार खोकल्याचा त्रास होत असल्याचे दिसून आले होते.
मात्र तरीही ते पुण्यातून कोल्हापूरच्या दौऱ्यावर गेले. तिथं नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर पवार यांची प्रकृती आणखीनच बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून पवार सध्या मुंबईत आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांनी काल शरद पवार यांना फोन करत त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केल्याचे कळते. तसंच पूर्णपणे बरं वाटेपर्यंत विश्रांती घ्यावी, अशी विनंतीही अजित पवारांनी काकांना केल्याचे समजते.
दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबात संघर्ष निर्माण झाला होता. मात्र हे सर्व विसरून अजित पवारांनी शरद पवारांना फोन केल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.