Published On : Mon, Nov 6th, 2017

2019 ला शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला विश्वास

Sharad Pawar

रायगड: शरद पवार हे २०१९ मध्ये पंतप्रधान होऊ शकतात, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वर्तवले आहे. २०१९ हे वर्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल, असा दावाही त्यांनी केला. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला सोमवारपासून सुरूवात झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाचा मुद्दा मांडला. शरद पवार २०१९ मध्ये पंतप्रधानही होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले.

गेल्या तीन ते चार महिन्यांत देशभरात सरकारविरोधी वातावरण तयार झाले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयांमुळे सामान्य जनता आणि व्यावसायिक नाराज असल्याचे पटेल यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही भाजपवर टीका केली. ज्या गुजरातचा विकास दाखवून मोदी पंतप्रधान झाले, त्या गुजरातमधील शेतकरी आज हवालदिल झाले आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना गल्लोगल्ली सभा घेण्याची वेळ आली.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपसाठी ही परिस्थिती लज्जास्पद आहे. याउलट देशाच्या राजकारणात शरद पवार यांच्या शब्दाला वजन असल्यामुळे सर्वत्र त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे पंतप्रधानही सभागृहात शरद पवार यांना मान देतात, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. दरम्यान, गुजरातच्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसबरोबर युती करायला तयार आहोत. वेगळे लढण्यात दोन्ही पक्षांचे नुकसान असल्याचे मत पटेल यांनी व्यक्त केले.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही काळापासून भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी उभारण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत. त्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस हे पक्ष सातत्याने प्रयत्नशील आहेत. परंतु, या आघाडीचे नेतृत्त्व कोण करणार, हा वाद कायम असल्याने ही आघाडी अजूनपर्यंत प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. मध्यंतरी नितीश कुमार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर तिसऱ्या आघाडीची चर्चा काहीशी थंडावली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी मुंबईच्या दौऱ्यावर असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तिसऱ्या आघाडीसाठी चाचपणी सुरू असल्याचे संकेत दिले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

Advertisement
Advertisement