Published On : Sat, May 26th, 2018

लिंगबदल : ललिताची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई: बीडमधील पोलिस शिपाई ललिता साळवेची ललित कुमार बनण्याची पहिली शस्त्रक्रिया शुकव्रारी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात झाली. सहा डॉक्टरांच्या पथकाने केलेली चार तासांची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.

ललिताची प्रकृती सामान्य काही दिवस तिला रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. ‘जेनिटल रिकन्स्ट्रक्शन सर्जरी’च्या प्रक्रियेतील ही पहिली शस्त्रक्रिया आहे. सहा महिन्यांनी तिच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येईल.

ललिता साळवेचं लिंग जन्मत:च अविकसित होतं. कुटुंबीयांना ललिता मुलगी वाटली, त्यामुळे तिचं संगोपन मुलींसारखचं झालं.

शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा यशस्वी
रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन आणि शस्त्रक्रिया पथकाचे प्रमुख डॉ. रजत कपूर यांनी सांगितलं की, “ललिताचा ललित बनण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. शुक्रवारी झालेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ललिताच्या शरीरात महिलांचा कोणताही अवयव नाही. तिच्या शरीरात पुरुषांच्या शरिरातलेच हॉर्मोन्स आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करून आम्ही तिच्या युरिनरी ब्लॅडरमध्ये एक नळी टाकली आहे, लवकरच ती पुरुषांप्रमाणे उभं राहून लघुशंका करू शकेल.

“रुग्णालयात अशाप्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेची माहिती मीडियामध्ये आल्यानंतर आम्हाला अनेक लोकांचे अशा शस्त्रक्रियेसाठी कॉल येत आहेत,” असंही डॉ. रजत कपूर यांनी सांगितलं


रुग्णालयाने केला खर्च
रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सामान्यत: अशाप्रकारच्या शस्त्रक्रियांचा खर्च खासगी रुग्णालयांमध्ये 1 ते 1.5 लाख रुपये असतो. मात्र ललिताच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च रुग्णालय उचलत आहे. यासाठी काही सामाजिक संस्थांचीही मदत घेतली जात आहे.

दाढी-मिशाही लावणार
डॉ. रजत कपूर यांनी सांगितलं की, “ललिता पूर्णत: पुरुष बनल्यानंतर सहा महिन्यांनी तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यानंतर तिच्या चेहऱ्यावर दाढी-मिशाही ट्रान्सप्लांट केल्या जातील, जेणेकरुन तिला पूर्णत: पुरुष झाल्याची भावना निर्माण होईल.

अविकसित लिंग
जन्माच्या वेळीच ललिता साळवेचं लिंग अविकसित होतं. शिवाय अंडाशयही दिसत नव्हतं. त्यामुळे कुटुंबीयांना ललिता मुलगी वाटली आणि त्यांनी तिचं संगोपन मुलीप्रमाणेच केलं. वयाच्या सातव्या वर्षी ललिताच्या अंडाशयाला ट्यूमर समजून एका डॉक्टरने शस्त्रक्रिया करुन ते काढलं होतं.

ललिताला ‘जेंडर डिस्फोरिया’
पुढे ललिताला महिला पोलिस दलात शिपाई म्हणून नोकरी मिळाली. मात्र तिला कायमच पुरुषासारखं जगायचं होतं. 2016 मध्ये तपासणीदरम्यान पहिल्यांदाच ललिताला ‘जेंडर डिस्फोरिया’ची समस्या असल्याचं डॉ. रजत कपूर यांना समजलं होतं.

सेंट जॉर्ज रुग्णालयाचे प्‍लास्‍ट‍िक सर्जन डॉ. रजत कपूर यांनी सांगितलं की, “जेनिटल रिकन्स्ट्रक्शन सर्जरीसाठी शुक्रवारी झालेली पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सहा महिन्यांनंतर दुसरी सर्जरी केली जाणार आहे. यानंतर ललिता सामान्य पुरुषासारखीच जगू शकेल.”