नागपूर : ऑपरेशन शक्ती अंतर्गत कारवाई करत नागपूर गुन्हे शाखा युनिट-1 ने हिंगणा हद्दीतील महालक्ष्मीकृपा गेस्ट हाऊसमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले. पोलिसांनी 55 वर्षीय नरेंद्र प्रभाकर निनावे या आरोपीला अटक केली असून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई 31 जुलै रोजी सायंकाळी 4.45 वाजता करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कानोळीबारा येथील गेस्ट हाऊसवर छापा टाकण्यात आला. तपासात आरोपी निनावे हा महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलून ग्राहकांना जागा पुरवत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून चार पीडित महिलांना ताब्यात घेतले असून, दोन मोबाईल फोन, ₹6,000 रोख आणि एकूण ₹52,170 किमतीचे साहित्य जप्त केले आहे. आरोपीविरुद्ध हिंगणा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 370(2) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत कलम 3, 4, 5 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, सहआयुक्त नवींचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त वसंत पडसाळी, उपायुक्त राहुल माकणिकर आणि सहायक आयुक्त अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल देशमुख, एपीआय सचिन भोंडे आणि त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास हिंगणा पोलीस करीत आहेत.