नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल सर्गममध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर सामाजिक सुरक्षा शाखेने (SSB) मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई १ जुलै रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७.१५ या वेळेत करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बिडगाव येथील हॉटेल सर्गमच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकला. या कारवाईत अतुल संजय भारती (वय ३१) याला महिलांना पैशासाठी देहव्यापारासाठी प्रवृत्त करताना रंगेहाथ पकडण्यात आले. घटनास्थळी दोन मोबाईल फोन, डीव्हीआर यंत्रणा, ३ हजार रुपयांची रोकड व इतर साहित्य असा एकूण ६१,४७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात आरोपीविरुद्ध कलम १४३(२) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास वाठोडा पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे शोध) राहुल माकणिकर, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाणे व त्यांच्या पथकाने केली.या कारवाईमुळे परिसरातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर आळा बसण्याची शक्यता आहे.