Published On : Wed, May 13th, 2020

रामबागेत नळाला येतेय मलवाहिनीचे पाणी

Advertisement

नागपूर : इमामवाडा, रामबाग, जाटतरोडी आणि ऊंटखाना परिसरातील वस्त्यांमध्ये नळाला मागील 2 महिन्यांपासून मलवाहिनीचे पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विषेश म्हणजे, दूषित पाणी पिल्याने रामबाग परिसरातील वस्त्यांमध्ये मलेरिया, पीलिया, टायफाॅईड या आजारांचे प्रमाण वाढले आहे. मागील सलग 2 वर्षांपासून भेडसावणाऱ्या या समस्यांमुळे आतापर्यंत 2 हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही नागरिकांनी समस्येविषयी प्रभाग क्र. 17-अ चे नगरसेवक विजय चुटेले आणि धंतोली झोनच्या सहाय्यक आयुक्तांना याविषयी निवेदन दिले; परंतु, संबंधितांनी त्यावर ठोस अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

प्राप्त माहितीनुसार, रामबाग परिसरात नळलाईन हीच स्थानिकांची तहान भागविण्याचे मुख्य माध्यम आहे. मागील 2 महिन्यांपासून येथील मलवाहिनी बुझल्याने नळाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याविषयक एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. रामबागेत होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे स्थानिकांना ऐन लाॅकडाउनच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी उन्हातान्हात वणवण भटकावे लागत आहे.
अरूंद गल्ल्यांमुळे रामबागेतील आतील भागात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे अवघड आहे. अशा स्थितीत नळलाईन हाच मुख्य आधार आहे. मात्र, सदर वस्तीत नळलाईन आणि मलवाहिनी एकमेकांना समांतर असल्याने मलवाहिनी बुझण्याची समस्या नित्यनेमाने भेडसावते. या समस्येविषयी महिनांनी नगरसेवक विजय चुटेले यांच्या कार्यालयावर मोर्चाही काढला. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार प्रीती लोखंडे यांनी केली. आमच्या चमूने या परिसरातील पाहणी केली असता नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अनेक धोकादायक बाबी रामबाग परिसरात आढळून आल्या. येथे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून संपूर्ण गल्ल्यांमध्ये दुर्गंधी पसरली आहे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जुनाट मलवाहिन्या आणि नळवाहिन्या बदलण्याची गरज आहे-
सातत्याने मलवाहिनी बुझत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. मनपाच्यावतीने मागील 19 वर्षांपूर्वी या भागात लोखंडी मलवाहिन्या आणि नळवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. सध्या त्या जागोजागी फुटल्याने दूषित पाणी थेट नळातील पाण्यामध्ये मिसळले जाते. तेच पाणी घरातील नळांना येत असल्याने विविध आजार वाढले आहेत. वस्तीतील महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय. बुझलेल्या मलवाहिनीतील पाणी मुख्य मार्गावर येत असल्याने डासांचे प्रमाणही वाढले आहे.

या पाण्याला भयंकर दुर्गंधी असल्याने लहान बालकांचा आणि आबाल वृद्धांचा श्वास गुदमरत असल्याचाही अनुभव काहींना आला आहे. मलवाहिनीच्या अनेक चेंबर्सवर झाकण नसल्याने एखाद्या वेळी वृद्ध व्यक्ती वा लहान बालक यामध्ये पडण्याचा धोका वाढला आहे. मनपाच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडे याविषची वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी त्याचा काहीही फायदा झाला नाही.

नगरसेवक ऐकत नसल्याने धंतोली येथील सहाय्यक झोन आयुक्तांनी तरी नागरिकांच्या समस्या सोडविणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केल्याने आता मनपा आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी संबंधित समस्येकडे जातीने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी अशी मागणी कल्पना गायकवाड, मीना अडकणे, गौरी गजभिये, वंदना वैद्य, रंजना नंदेश्वर, राजू नक्षणे यांसह इतर नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Advertisement