नागपूर :जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात काल रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली. या अपघातात कारमध्ये असलेले तिन्ही तरुण जागीच ठार झाले.मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ होते. सुरज सिद्धार्थ चव्हाण (वय ३४, बुटीबोरी), साजन सिद्धार्थ चव्हाण (वय २७, बुटीबोरी) आणि संदीप चव्हाण (वय २७,रा. बुटीबोरी) असे मृतकांची नावे आहे.
हा भीषण अपघात रात्री ११:३० च्या सुमारास घडला.या अपघातामुळे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कारमध्ये तीन तरुण बसले होते.त्यापैकी एक तरुण ड्रायव्हिंग शिकत होता. अचानक कारवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याजवळील एका उघड्या विहिरीत पडली. विहिरीची खोली सुमारे पंधरा फूट होती, त्यामुळे कार आणि त्यात अडकलेला तरुण तिथेच बुडाला. अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी तात्काळ बुटीबोरी पोलिस, अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन मदत संस्थांना माहिती दिली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यानंतर कार विहिरीतून बाहेर काढली. मात्र, त्यावेळी तीन जणांना आपला जीव गमवावा लागला.
या अपघाताची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर, जखमी तरुणांपैकी एक ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेत असताना गाडी चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विहिरीभोवती जाळे किंवा कोणतेही आवरण नसल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.अशा अपघातांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी, सार्वजनिक ठिकाणी आवरण बसवणे आणि अधिक सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे तज्ञांचे मत आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांना खूप धक्का असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. पोलिस घटनास्थळी अधिक तपास करत आहेत. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजनांची आवश्यकता आहे.