Published On : Tue, May 29th, 2018

राजकीय वादातून सात वर्षांच्या मुलीची हत्या?

रायगड : जिल्ह्यातील माणगाव येथे चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सात वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ही हत्या राजकीय वादातून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दिया जाईलकर या सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह अखेर सापडला असून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.

दियाची आई नुतन जाईलकर या शिवसेना पक्षाकडून बिनविरोध निवडून आल्या होत्या. यामुळे या गावात राजकीय वाद निर्माण झाला होता. राजकीय वैमनस्यातूनच दियाचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हत्येच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) माणगावमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.

माणगावमधील वावे गावात राहणारी दिया जाईलकर ही मुलगी २५ मेला संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास दुकानातून काही वस्तू आणायला घराबाहेर पडली होती. मात्र बराच वेळ झाला तरी दिया घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दिया बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. सोमवारी संध्यााकाळी साडे सातच्या सुमारास दियाचा मृतदेह गावातीलच बंद घरात सापडला. वावे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दियाची आई नुतन जाईलकर या बिनविरोध निवडून आल्या होत्या. मंगळवारी याबाबतची अधिकृत घोषणाही होणार होती. या निवडणुकीच्या रागातूनच दियाची हत्या केल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही.