मुंबई: प्लास्टिकचे उत्पादन, वापर आणि नष्ट करण्यासंदर्भात उद्योजकांनी सुचविलेल्या पर्यायावर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिव पातळीवरील एका समितीची स्थापना केली आहे.
आज मंत्रालयात प्लास्टिक उद्योजकांच्या बैठकीत प्लास्टिकचा वापर आणि नष्ट करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते.
सचिव पातळीवरील समितीमध्ये मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, पर्यावरण विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बल्गन यांचा समावेश आहे. ही समिती उद्योजकांनी सादरीकरणातून मांडलेल्या मुद्यांचा अभ्यास करुन प्लास्टिक बंदीबाबत शासनाने नियुक्त केलेल्या शक्ती प्रदक्त समितीला (High power Committee) आपला अहवाल सादर करणार आहे.
प्रारंभी प्लास्टिक उद्योजक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सादरीकरणातून प्लास्टिकचे होणारे रिसायकलिंग, त्यातून तयार होणाऱ्या वस्तू, प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट, प्लास्टिक एकत्र करण्याची पद्धत, जनतेचा सहभाग, जनजागृती, शासनास करावयाचे सहकार्य आदीसंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी प्लास्टिक उद्योगातील अनेक उद्योजक उपस्थित होते.