Published On : Tue, May 11th, 2021

कोरोनाच्या संकटावर मात करून लोकांची सेवा करा : ना. नितीन गडकरी

स्वत:ची काळजी घ्या, दुर्दम्य आत्मविश्वास ठेवा ग्रामीण भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद

नागपूर: कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगावर आले आहे. आपला जीव धोक्यात घालून भाजपाचे कार्यकर्ते लोकांना मदत करीत आहे. कोरोनाची पुन्हा लाट येण्याचे सूतोवाच अनेक तज्ञांनी केले असताना या लाटेवर मात करून स्वत:ची काळजी घेत आणि दुर्दम्य आत्मविश्वास बाळगून लोकांची सेवा करा. या संकटाची लाट ओसरली की पुन्हा जनजीवन सुरळीत होईलच असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Advertisement

नागपूर जिल्हा ग्रामीण भाजपा कार्यकर्त्यांशी ना. गडकरी संवाद साधत होते. या आभासी कार्यक्रमात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. सावरकर यावेळी उपस्थित होते. आपण सर्वजण राजकारणातले कार्यकर्ते आहोत, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- राजकारणाचा अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडतो. राजकारण म्हणजे राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकासकारण आहे. सत्तेचे राजकारण म्हणजे केवळ सत्ता बदलणे हा आपला उद्देश नाही, तर राज्य, देश, समाज आपल्याला बदलायचा आहे. समाजाचे परिवर्तन आणि देशाचे पुनर्निर्माण करायचे आहे. सुखी, संपन्न व शक्तिशाली राष्ट्र निर्माण करायचे हे आपले मिशन आहे. हे करीत असताना आलेल्या संकटावर मात करून जनतेची सेवा करायची आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement

कोरोना संकटाची लाट आहे. या लाटेवर मात करून आपल्याला पुढे जायचे आहे, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडे दुर्दम्य आत्मविश्वास असला पाहिजे. निराशा, नकारात्मकता नको. आपल्या अनेक प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेले, त्यामुळे अस्वस्थता येणे स्वाभाविक आहे. पण आता कोरोनामुळे कुणाचा मृत्यू होऊ नये म्हणून स्वत:ची काळजी घेत सेवा करण्याचा निर्धार आपल्याला करायचा आहे. सुधीर देऊळगावकर यांनी कोरोनासाठी गोळ्यांची एक लहानशी कीट तयार केली आहे. ती खेड्यापाड्यातून वितरित करा. ती कीट परिणामकारक आहे. कोरोना तपासणीसाठी एका ट्रेलरवर आपण प्रयोगशाळा उभी केली आहे. सुरेश भट सभागृहाजवळ ती उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी याचा वापर करावा.

ऑक्सीजनची व्यवस्था आपण केली आहे. आज 19 टँकर आले आहेत. सर्व विदर्भातही आपण ऑक्सीजन टँकर पाठवितो आहे. सिंगापूरहून विमानाने 3 क्रायोजेनिक ऑक्सीजन टँकर आपण आणत आहोत. याशिवाय हवेतून ऑक्सीजन तयार करण्याचे प्लाण्ट सुरु करीत आहोत. यासाठी अनेकांनी आपल्याला मदत केली आहे. ग्रामीण भागातही ऑक्सीजन प्लाण्ट टाकण्याची गरज आहे. 500 व्हेंटिलेटर आपण वाटप केले. 1500 ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर बोलावले आहे, ते आदिवासी आणि दुर्गम भागात दिले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

याप्रसंगी कन्हेरे, कन्हैया कटारिया आणि छोटू बोरीकर यांच्या कामाचे ना. गडकरी यांनी कौतुक केले. अनेकांचे जीव वाचविण्याचे काम या तीन कार्यकर्त्यांनी केले आहे. येत्या 27 मे रोजी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम, प्रसिध्दी, प्रचाराचे कार्यक्रम, हारतुरे यावर खर्च न करता रक्तदान शिबिरे घ्या असे आवाहनही ना. गडकरी यांनी केले. कोरोनाचे संकट गंभीर आहे, सध्या तयारीसाठी वेळ आहे.

या काळात पूर्ण तयारी करा. ऑक्सीजनमुळे किंवा औषधोपचारामुळे कुणाचाही जीव जाऊ नये यासाठी प्रयत्न करा. तसेच कोरानामुक्त होण्यासाठी 100 टक्के लसीकरण करा. सर्वांनी लस घेणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत स्तरापासून लसीकरणासाठी जनजागृती करून लोकांना लस घ्यायला प्रोत्साहित करा, त्याशिवाय हे संकट जाणार नाही, हीच सेवा आपल्या कार्यकर्त्यांना करायची आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement