नागपूर: जीएस कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ प्राध्यापकाने प्रशासकीय जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गजानन कराळे (वय ४१) असे मृत प्राध्यापकाचे नाव असून त्यांनी नरेंद्र नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हे टोकाचे पाऊल उचलतांना ते घरी एकटेच असून त्यांची पत्नी आणि मुलगा अमरावतीला गेले होते, अशी माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजमधील चालू असलेल्या प्रशासकीय चौकशीच्या वाढत्या दबावामुळे प्राध्यापकाने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. कराळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती.
बेलतरोडी पोलिसांनी हे सुसाईड नोट हस्तगत केले असून यात प्राध्यापक कराळे यांनी कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या पाच ते सहा फॅकल्टी मेमेंबर्सची नावे नमूद केली आहेत. यांच्या जाचाला कंटाळून आपण आपले जीवन संपवीत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले. तसेच यात त्यांनी आपल्या बायकोला आणि सहा वर्षाच्या मुलाला त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकलो नसल्याने सॉरी म्हटले आहेत.
बेलतरोडी पोलिसांनी प्राध्यापकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसीएच) पाठवला आहे. पोलिसांकडून घटनेची पुढील चौकशी करण्यात येत आहे.