
नागपूर : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी क्रीडा राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ, वादळी नेते गुलाबराव गावंडे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर नागपूरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून गुलाबराव गावंडे यांना अस्वस्थ वाटत होते. प्रकृती अधिक बिघडताच त्यांना तातडीने अकोल्यातील खासगी आयकॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना नागपूरच्या अर्नेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सुमारे तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेत त्यांच्या हृदयातील दोन ब्लॉकेज यशस्वीरीत्या काढण्यात आली आहेत.
ही माहिती त्यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी दिली. “शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत,” असे त्यांनी सांगितले.
अकोला शहरातील कौलखेड परिसरातील रहिवासी असलेले गुलाबराव गावंडे हे विदर्भातील आक्रमक आणि वादळी नेता म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली असून विदर्भात पक्षसंघटन मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मंत्रिमंडळात त्यांनी तब्बल चार वर्षे विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.
गुलाबराव गावंडे हे तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून तीन वेळा विधानसभेवर निवडून आलेले आहेत. १९९० मध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा, १९९५ मध्ये अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू (आताचा अकोला पूर्व) आणि २००४ मध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत बोलू दिले जात नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी सभागृहात अंगावर रॉकेल ओतून घेतल्याची घटना एकेकाळी राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिक सक्रिय भूमिका घेतली. त्यांच्या आजारपणाची बातमी समजताच राजकीय वर्तुळातून तसेच समर्थकांकडून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना होत आहे.








