Published On : Mon, Jul 8th, 2019

सात दिवसांत प्रस्ताव पाठवा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा परिषदेतील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

नागपूर,: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचे प्रस्ताव 15 जुलैपर्यंत पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्ह्यातील विकासकामांबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, उकेश चौहान यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, जिल्हा नियोजन अधिकारी मिलींद नारिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजना 2018-19 अंतर्गत झालेली विविध कामे व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सन -2019-20 कामांचे प्रस्ताव या बाबत पालकमंत्री चद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला.

यावेळी नावीन्यपूर्ण योजना, कौशल्य विकास योजना, पाणी पुरवठा,दलित वस्ती सुधार योजना, मस्त्यविकास, मेडा, महाऊर्जा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसिंचन विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, रेशीम उद्योग, व्यवसाय शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगार, कौशल्य विकास, फॉरेन्सीक सायन्स, जिल्हा ग्रंथालय, जिल्हा क्रीडा विभाग, आरोग्य विभाग, नगररचना, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालकल्याण विकास, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग या विभागातील विविध योजनांचा समावेश होता. जिल्हा नियोजन समितीकडून विभागांना प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाचाही आढावा घेण्यात आला.

जिल्ह्यात एकूण सर्व कामांचा सद्य:स्थितीचा अहवाल व प्रस्ताव 15 जुलैपर्यंत सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केल्या. यात प्रत्येक ठिकाणी सुरू असलेल्या कामावर अधिकाऱ्यांनी जाऊन निरीक्षण करावे. तसेच कामे पूर्ण किंवा अपूर्ण याबाबतचा स्पष्ट अहवाल तयार करावा. अपूर्ण असलेली कामे किती दिवसात पूर्ण करण्यात येतील, याबाबतची माहिती सादर करावी. प्रत्येक कामाचे छायाचित्र व चलचित्रीकरणासह माहिती द्यावी, अशा विविध सूचना त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गंत जिल्हा परिषद परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.