नागपूर: कायद्याच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी आणि व्यवसाय म्हणून या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरूणांसाठी शनिवार, २१ एप्रिलला ‘कायद्यात करा करीयर’ अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात विधी क्षेत्रातील तज्ज्ञ व मान्यवर मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणि साप्ताहिक ‘युवा करीयर’ यांचे हे संयुक्त आयोजन आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले कायदामंत्री होते. त्यांनी देशाला जगातील सवोत्कृष्ठ संविधान दिले. या संविधानात कायदेबाबत असलेल्या कलमांमुळे देशात लोकशाहीचा पाया मजबूतपणे रोवला गेला. आजच्या तरूणाला कायदेविषय ज्ञान असावे, ही काळाची गरज आहे. त्यामुळे या चर्चासत्राचे महत्व आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठा व युवा करियर तर्फे सामाजीक दायीत्वाचा भाग म्हणून तरूणांमध्ये कायदेविषयक आवड व करीयर म्हणून निवड करण्यासाठी हे चर्चासत्र महत्वाचे ठरेल. इयत्ता १२ वी उत्तीर्ण किंवा इयत्ता १२ वी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम पुढील काळासाठी अत्यंत मोलाचा ठरेल.
कायद्याच्या क्षेत्रात व्यवसाय म्हणून निवड करताना अनेक संधी उपलब्ध आहेत. या चर्चासत्राला मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपीठचे न्या.झेड ए हक, अनुसूचित जाती आयोगा अध्यक्ष माजी न्या. सी.एल.थुल, विभागीय आयुक्त अनुपकुमार, उच्च न्यायालयाचे माजी न्या. आर.सी.चव्हाण, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील तसेच नागपूर विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंद्र कुमार, मान्यवर मार्गदर्शन करतील. या चर्चासत्राद्वारे कायदा क्षेत्रात करीयर करण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय तसेच तरूणांना कायदे क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एन.एम.साखरकर आणि ‘युवा करीयर’ साप्ताहिकाचे मोनाल थुल यांनी या चर्चासत्रात तरूणांनी व कायदे क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठया संख्येत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. चर्चासत्राला मोफत प्रवेश आहे.

