Published On : Thu, Mar 28th, 2019

मालमत्ता कर थकबाकीदारांच्या संपत्तीची मनपातर्फे विक्री

मनपाच्या इतिहासात प्रथमच कार्यवाही : १२० स्थावर मालमत्ता होणार मनपाच्या नावे

नागपूर : शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सुचना देउन व अनेकदा संधी देउनही थकीत कर न भरणाणा-या थकबाकीदारांवर मनपाने कठोर कारवाई करीत संपत्तीची विक्री सुरू केली आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच मालमत्ता कर थकबाकीदारांच्या संपत्तीचा जाहीर लिलाव करून विक्री करण्यात आली आहे. याअंतर्गत हनुमान नगर झोनमधील थकबाकीदाराच्या विक्री केलेल्या संपत्तीचे विक्री प्रमाणपत्र गुरूवारी (ता.२८) दुय्यम सह निबंधक वर्ग-२ कार्यालयात मनपा उपायुक्त राजेश मोहिते यांच्या हस्ते खरेदीदाराला प्रदान करण्यात आले.

यावेळी सहायक आयुक्त (कर) मिलींद मेश्राम, हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त राजु भिवगडे, हनुमान नगर झोनचे सहायक अधीक्षक विकास रायबोले, राजस्व निरीक्षक गौरीशंकर रहाटे, राजस्व निरीक्षक रामदास चरपे आदी उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांकडे असलेल्या थकीत कर वसुलीसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे अनेकदा विविध प्रकारच्या कारवाई करण्यात आल्या. यासंदर्भात थकबाकीदारांना वॉरंटही बजावले, जप्तीची कारवाईही करण्यात आली होती. मात्र यानंतरही थकबाकीदारांनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहता नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेत थकबाकीदारांच्या संपत्तीचा जाहीर लिलाव केला.

यासंबंधी मनपाने थकबाकीदारांची मालमत्ता वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली व त्यानंतर या संपत्तींचा पारदर्शी पद्धतीने जाहीर लिलाव करण्यात आला. लिलावातील महत्तम बोलीला संपत्तीची विक्री करण्यात आली. या संपूर्ण कार्यालयीन प्रक्रियेला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला.

मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात मनपाने कठोर कारवाईचा पवित्रा घेत एकूण तीन संपत्तींची जाहीर लिलावाद्वारे विक्री केली आहे. याअंतर्गत गुरूवारी (ता.२८) हनुमान नगर झोनमधील एका खरेदीदाराला विक्री प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तर शुक्रवारी (ता.२९) दोन खरेदीदारांना विक्री प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जाहीर लिलाव प्रक्रियेमध्ये खरेदीदार उपलब्ध न झालेल्या संपूर्ण शहरातील १२० स्थावर मालमत्ता नागपूर महानगरपालिकेच्या नावावर करण्यात येणार आहे. खरेदीदार उपलब्ध न झालेल्या या स्थावर मालमत्ता नाममात्र शुल्कावर लवकरच मनपा आयुक्तांच्या नावे करण्यात येणार आहे.

नागपूर महानगरपालिकेतर्फे ही कारवाई नियमीत सुरू राहणार आहे. अनेक वर्षांपासून मालमत्ता कर थकबाकीदारांना यामार्फत शेवटची संधी दिली जाणार असून थकीत कर भरणा लवकरात लवकर करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.