नागपूर : मनपाच्या धंतोली झोन अंतर्गत विजय टॉकीज ते आनंद टॉकीज या मार्गाला ज्येष्ठ पत्रकार, माजी स्थायी समितीचे सभापती तथा समाज सेवक स्वर्गीय उमेशबाबू चौबे यांचे नाव देण्यात आले. नुकतेच महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्वर्गीय उमेश बाबू चौबे मार्गाचे लोकार्पण केले.
याप्रसंगी केंद्रीय खादी ग्रामोद्योग आयोगाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक प्रमोद चिखले, नगरसेविका हर्षला साबळे, नगरसेवक विजय चुटेले, साहित्यकार डॉ.ओम प्रकाश मिश्रा, नगरसेविका लता काटगाये, कार्यक्रमाचे संयोजक नगरसेवक निशांत गांधी, नगरसेवक विजय चुटेले, माज़ी नगरसेवक मनोज साबळे, मंगलाबेन पटेल समाजसेवी कन्नू बाबु चौबे, हरीश देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर म्हणाले, उमेशबाबू चौबे यांनी आयुष्यभर शोषित, वंचित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा आवाज बुलंद केला. शहराचे सजग रक्षक म्हणून ते नेहमी जागरूक होते. शहिदांना सन्मान मिळावे यासाठी त्यांनी आपल्या जीवनात मोठा लढा दिला. सदैव लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणा-या उमेशबाबू चौबे यांच्या नावाने मार्गाचे लोकार्पण होणे ही आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आहे, असेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.
उमेशबाबूंच्या कार्यापुढे समर्पित भावनेने मनपाचे हे छोटे कार्य असले तरी भविष्यात नागपूर महानगरपालिका मोठे निर्माण कार्य त्यांना समर्पित करेल, अशी ग्वाहीही महापौरांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीरज चौबे यांनी केले. संचालन राजेश कुंभलकर यांनी तर आभार उपकार्यकारी अभियंता नीलेश सांबरे यांनी मानले.