नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे महिला व बालकल्याण समितीअंतर्गत दिव्यांग व्यक्तींकरिता तसेच गरजू महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत मनपा स्थापना दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (ता. ३) नागपूर क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींकरिता सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान योजनेअंतर्गत तसेच शिवणयंत्र वाटप योजनेअंतर्गत १५ लाभार्थ्यांना महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यात सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान योजनेत ६ दिव्यांग तर शिवणयंत्र वाटप योजने ९ गरजू महिलांचा समावेश आहे.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या धनादेश वाटपाच्या कार्यक्रमात महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, उपसभापती अर्चना पाठक, सदस्या स्नेहा निकोसे, मंगला लांजेवार, उज्ज्वला शर्मा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक दिनेश यादव, समाज विकास अधिकारी दीनकर उमरेडकर, नूतन मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, दिव्यांगांच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिका जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ देत आहे. दिव्यांग व्यक्तीने सुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपली उन्नती करावी या उद्देशाने मनपातर्फे अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यात येत आहे. याशिवाय कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांना उदर्निवाह करता यावा यासाठी त्यांना प्रथम प्राधान्य देऊन शहरातील महिलांना शिलाई मशीनसाठी आज धनादेश देण्यात आले. अनुदानाचा उपयोग प्रत्येकाने आपल्या व्यवसायासाठी करून चांगली सुरुवात करावी, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. महापौरांनी सर्व दिव्यांग तसेच गरजू महिला लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच महिला व बालकल्याण समितीचे अभिनंदन केले.
महिला व बालकल्याण समितीतर्फे दिव्यांगांना व गरजू महिलांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. समितीमार्फत दिव्यांगांना ईरिक्षा, मोटराईज ट्रायसिकल देण्यात आलेल्या आहेत. तसेच कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांना लाभ देण्यासाठी त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आला, असे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिव्या धुरडे यावेळी म्हणाल्या.
यावेळी कोरोना काळात पती गमावलेल्या ९ महिलांना शिवणयंत्र घेण्यासाठी प्रत्येकी ११,५०० रुपयाचे धनादेश देण्यात आले. यात सुनीता भूपेंद्र दुबे, रंजना गिरीश पाटील, शालू प्रभाकर डोंगरे, रजनी मनोहर गायकवाड, वर्षा संजय गोतमारे, वर्षा जितेंद्र कलोडे, रंजना विजय बोरकर, अर्चना विलास भोसकर आणि धनश्री लालजी चरडे या लाभार्थ्यांचा समावेश आहे. तसेच सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान योजनेअंतर्गत ६ दिव्यांग लाभार्थ्यांना ४ लाख ३६ हजार ७३५ रुपयाचा धनादेश देण्यात आला. यामध्ये गौरव सुरेंद्र कावरे (संगणक), हर्षा मदन पाचाळ (व्हील चेयर), अंकित मन्नूप्रसाद भारती (लॅपटॉप), देविदास सीताराम मेश्राम (झेरॉक्स मशीन), नजमिन जमील शेख (लॅपटॉप), भूषण दिलीप नाथे (लॅपटॉप) या लाभार्थ्यांचा समावेश आहे.