
नागपूर– महाराष्ट्र राज्याचे प्रथम उपमुख्यमंत्री तथा युगांतर शिक्षण संस्था, नागपूरचे संस्थापक अध्यक्ष स्व. नाशिकराव उर्फ बाळासाहेब तिरपूडे यांच्या जयंतीनिमित्त युगांतर शिक्षण संस्थेच्या वतीने दिले जाणारे वार्षिक सामाजिक पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आले आहेत. दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी नागपूर येथे हा सन्मान सोहळा होणार आहे.
यंदाचा स्व. बाळासाहेब तिरपूडे सामाजिक पुरस्कार कृषी व साहित्याच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे प्रसिद्ध कृषितज्ज्ञ व लेखक श्री. अनंत भोयर यांना जाहीर करण्यात आला आहे. तर स्व. श्रीमती कलाताई तिरपूडे जीवन गौरव पुरस्कार उमरेडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा यशस्वी महिला उद्योजिका श्रीमती प्राजक्ता कारु यांना देण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
अनंत भोयर हे नागपूर जिल्ह्यातील कचारी सांवगा येथील नामवंत कृषितज्ज्ञ असून ग्रामीण कथा, कादंबऱ्या व कृषिविषयक लेखनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या कार्यासाठी त्यांना कृषिभूषण पुरस्कार तसेच महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कृषी कार्यावर आधारित जर्मन टेलीफिल्मही प्रदर्शित झाली आहे.
दरम्यान, जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या प्राजक्ता कारु या कास्तकार फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या संचालिका असून खादी ग्रामोद्योग आयोगाच्या मास्टर ट्रेनर आहेत. विदर्भातील सुमारे ७०० महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या योगदानाबद्दल स्वयंसिद्ध २०१७, आयकॉन ऑफ गडचिरोली २०१८, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका २०१९ आदी पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा युगांतर शिक्षण संस्था, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे सकाळी १०.३० वाजता होणार असून, तत्पूर्वी १०.०० वाजता स्व. बाळासाहेब तिरपूडे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येईल. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.








