Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jan 25th, 2020

  बचत गट महिलांचा हक्काचा उत्सव म्हणजेच उद्योजिका मेळावा

  वक्त्यांचे गौरवोद्‌गार : ‘फॅशन शो’ने आणली रंगत, रविवारी समारोप

  नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे मागील १० वर्षांपासून आयोजित करण्यात येणारा महिला उद्योजिका मेळावा आता विदर्भातील बचत गट महिलांचा हक्काचा उत्सव झाला आहे. ह्या उत्सवात महिला शासकीय योजनांची माहिती मिळवितात. आपल्या उद्योगाला बळ देतात. मार्केटिंगचे तंत्र शिकतात आणि आपल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून घेत त्याची विक्री करतात. वर्षभरात एकदा आयोजित होणारा हा मेळावा म्हणजे उत्सवच असल्याचे प्रतिपादन नेहा पटेल यांनी केले.

  नागपूर महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने १९ ते २६ जानेवारीदरम्यान रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या सातव्या दिवशी उपस्थित महिला मार्गदर्शकांनी बचत गटांविषयी आणि मेळाव्याविषयी गौरवोद्‌गार काढले.

  यावेळी मंचावर उपमहापौर मनीषा कोठे, श्रीमती खोपडे तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून नेहा पटेल आणि शिल्पा अग्रवाल उपस्थित होत्या. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संगीता गिऱ्हे, उपसभापती दिव्या धुरडे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, माजी उपसभापती विशाखा मोहोड, नगरसेविका भारती बुंडे यांचीही मंचावर उपस्थिती होती.

  याप्रसंगी बोलताना शिल्पा अग्रवाल म्हणाल्या, ध्येय बाळगणाऱ्या स्त्रियांसाठी आकाश मोकळे आहे. ध्येयप्राप्तीसाठी आत्मविश्वास, मेहनतीच्या जोरावर महिला कुठल्याही क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठू शकतात. कुठलेही काम लहान-मोठे नसते. फक्त ते करण्याची जिद्द हवी. पैसा नाही, असे म्हणून चालणार नाही. सुरुवात महत्त्वाची आहे. सुरुवात करा, पुढे जा, यश नक्कीच तुम्हाला मिळेल, असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांना दिला. उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी लोकशाही पंधरवाडा बद्दल माहिती देत मतदार यादीत नाव नोंदवून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले.

  यावेळी नागपुरात विविध क्षेत्रात कार्यरत पाच महिलांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये मिनश्री महेंद्रकुमार रावत, गुरु डॉ. अन्नोम्मा साखरे, सुधाजी संतोष अग्रवाल, प्राजक्ता आदमने-कारू, क्रांती गेडाम यांचा समावेश होता. प्रास्ताविकातून नगरसेविका भारती बुंडे यांनी महिला उद्योजिका मेळाव्यामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे संचालन अंकिता मोरे यांनी केले. आभार कविता खोब्रागडे यांनी मानले.

  उपायुक्तांच्या नेतृत्वात फॅशन शो मधून जनजागृती
  सत्कार सोहळ्यानंतर आयोजित फॅशन शो ने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. पारंपरिक आणि पाश्चिमात्य पोषाख परिधान केलेल्या महिलांनी उपस्थितांची मने जिंकली. यानंतर उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्या नेतृत्वातील एका आगळ्यावेगळ्या फॅशन शो ने पाणी वाचवा, प्लास्टिकचा वापर टाळा, कचरा विलग करा असे संदेश देत जनजागृती केली.

  तत्पूर्वी दुपारच्या सत्रातही महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बचत गटांच्या महिलांची उपस्थिती होती.

  रविवारी समारोप
  महिला उद्योजिका मेळाव्याचा समारोपीय कार्यक्रम २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. संस्कार भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्ष कांचनताई गडकरी, ॲक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष अमृता फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. अध्यक्षस्थानी महापौर संदीप जोशी राहतील. यावेळी नागपूरकरांनी उपस्थित राहावे आणि महिला उद्योजिका मेळाव्यातील बचत गटांतील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या स्टॉलला भेट द्यावी, असे आवाहन महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे आणि उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145