नागपूर – शहरातील वाठोडा भागात पुन्हा एक धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. लूटपाटीच्या उद्देशाने एका सुरक्षा रक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली तर एक अल्पवयीन मुलगा ताब्यात घेतला आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लुटीचा उद्देश आणि धारदार हत्याराने हल्ला-
घटना वाठोडा रोडवरील एका पेट्रोल पंपाच्या जवळील बांधकाम साइटवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चोरीसाठी आलेल्या तिघा युवकांनी चौकीदार लक्ष्मण मुळे (वय 48) यांच्यावर हल्ला चढवला. लुटीवेळी चौकीदाराने प्रतिकार करताच, आरोपींपैकी एकाने त्याच्या छातीत धारदार शस्त्राने दोन वार करत जागीच ठार मारले.याआधीही आरोपींनी एक पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या युवकाला लुटून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला होता. ही घटना घडत असतानाच पोलिसांना माहिती मिळाली.
गस्तीवरील पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप-
वाठोडा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल चंद्रकांत निंबाळते आणि पोलीस कॉन्स्टेबल किरण गस्त घालत असताना त्यांना प्रत्यक्षदर्शीने घटनेची माहिती दिली. लगेचच त्यांनी घटनास्थळाजवळील झोपडपट्टीत तपासणी केली. संशयित कुणाल वानखेडे (वय 20) याला ओळखताच त्याने पळ काढला, मात्र तपासदरम्यान चौकीदाराचा मृतदेह आढळून आला.
तासाभरात आरोपी जेरबंद-
घटनेनंतर तातडीने हालचाल करत वाठोडा पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने दोन आरोपींना अटक केली, तर एक विधिसंघर्ष बालक ताब्यात घेतला. अटकेतील आरोपी पुढीलप्रमाणे:
कुणाल वानखेडे (20), भांडेवाडी – आधीच्या गुन्ह्यांतही रेकॉर्डवरील आरोपी
घनश्याम बंजारी (25), भांडेवाडी
तिसरा आरोपी अल्पवयीन
खुनाचा गुन्हा दाखल; तपास सुरू
पोलिसांनी या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवला असून तपास सुरु आहे. प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे की चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली. परिसरात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पोलिसांनी गस्त आणि गुप्त रेकी वाढवली आहे.
नागपूरसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. झोपडपट्टी भागातील युवकांचे गुन्हेगारीकडे वळण, आधीपासून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची मुक्तसंचार व्यवस्था आणि अल्पवयीन मुलांचाही गुन्ह्यात सहभाग या गोष्टी प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरू शकतात.