Published On : Fri, Nov 20th, 2020

२३ नोव्हेंबर पासून शाळा सुरु करावी

मनपा,जिप, शिक्षण विभागाची आढावा बैठक :शिक्षकांची चाचणी मनपा नि:शुल्क करणार

नागपूर : नागपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाव्दारे दिल्या गेलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नुसार सुरु करावे, असे निर्देश शिक्षण विभाग मनपा, शिक्षण विभाग जिल्हापरिषद व शिक्षण उपसंचालकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आले. राज्य शासनाने सोमवार २३ नोव्हेंबर पासून इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतची माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याचे आदेश निर्गमित केले आहे.

नागपूर शहरात इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी पर्यंत ५९३ शाळा आहेत. या शाळेचे ६२५२ शिक्षकांची आर.टी.पी.सी.आर चाचणी (कोरोना चाचणी) मनपाच्या ५० कोव्हीड -१९ चाचणी केन्द्रात आणि सहा वॉक इन सेंटर मध्ये नि:शुल्क केली जाईल, असे मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी सांगितले. बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री. संजय निपाणे, उपायुक्त व उपसंचालक (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. प्रदीप दासरवार, शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर, जिल्हापरिषदेचे माध्यमिक शाळेचे शिक्षणाधिकारी श्री. चिंतामण वंजारी, शिक्षण उपसंचालकचे प्रतिनिधी श्री. श्रीराम चव्हाण आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार उपस्थित होते. सर्व खाजगी खाळांचे मुख्याध्यापकांशी वीडियो कान्फ्रेसिंगच्या माध्यमाने चर्चा करुन शासनाचे शाळा उघडण्यासंबंधीचे निर्देश देण्यात आले.


आतापर्यंत नागपूर शहरातील खाजगी शाळातील ३० टक्के शिक्षकांनी कोव्हीड चाचणी करुन घेतली आहे आणि उर्वरीत शिक्षकांना लवकरात लवकर चाचणी करुन घेण्याचे निर्देश दिले आहे. श्री. वंजारी यांनी सांगितले की दहावी आणि बारावीच्या पूरक परीक्षा सध्या सुरु झाल्या आहेत. तरी दहावीच्या ७ शाळा आणि १२ वी चे ७ कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा संपल्यानंतर सुरु होतील. नागपूरात ५९३ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जवळपास १,३२,००० विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषय शिकवीले जातील.

अतिरिक्त आयुक्त श्री. संजय निपाणे यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळा सुरु करण्यापूर्वी पालकांचे सम्मतिपत्र घेण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की मनपाच्या माध्यमाने शाळांना सर्व वैद्यकीय सुविधा देण्यात येतील. सर्व शाळांना थर्मामीटर, थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर, जंतुनाशक साबण इत्यादीची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्व शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची रोज थर्मल स्क्रीनींग केली जाईल तसेच शाळेच्या आवारात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. शाळेत चार पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाही तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या साहित्याची जसे मास्क, पाण्याची बॉटल, शालेय साहित्य याची अदलाबदल करु नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहे. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. संशयीत कोविड-१९ रुग्ण शाळेत आढळल्यास त्याला इतरांपासून वेगळे ठेवावे व त्वरीत आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावा. आजारी मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराचे नियमानुसार करण्याचे आदेश दिले आहेत. पालकांना सुध्दा विद्यार्थ्यांना स्वत: त्यांच्या वैयक्तीक वाहनाने शाळेत सोडण्याचे सांगितले आहे. स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही, तसेच रोज निर्जंतुक करण्यात येतील, असेही श्री. संजय निपाणे यांनी सांगितले.