नागपूर : राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू असून, आता गडचिरोली जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रविंद्र पंजाबराव सलामे यांना अटक करण्यात आली आहे. सदर पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांना सहआरोपी महेंद्र म्हैसकर यांच्यासोबत कट रचल्याचा आणि कर्तव्यदोष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गुरुवारी सलामे यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) अलीकडेच सलग अटकसत्र सुरू केले आहे.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी क्रमांक १ पराग नानाजी पूडके (रा. लाखनी, भंडारा) याने कोणत्याही शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती न झाल्यानेही बनावट दस्तऐवज सादर करून जेवणाळा येथील नानाजी पूडके विद्यालयात मुख्याध्यापकपद मिळवले. पूडके याने जिल्हा परिषद, नागपूर येथील शिक्षण अधिकाऱ्यांच्या बनावट नियुक्ती आदेशासोबत सेवा सतत्य प्रमाणपत्र आणि एस.के.बी. स्कूल, यादव नगर, नागपूर या शाळेच्या नावाने बनावट अनुभव प्रमाणपत्रही तयार केले.
हे सर्व दस्तऐवज आरोपी क्रमांक ६ महेंद्र म्हैसकर याच्या मदतीने बनवण्यात आले आणि ते दस्तऐवज तत्कालीन भंडारा जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी असलेल्या रविंद्र सलामे यांच्या समोर सादर करण्यात आले. सलामे यांनी कोणतीही चौकशी न करता ते मंजूर केले.
सदर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी बड्या अधिकाऱ्यांच्या सहभागाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.