नागपूर :राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चौकशी समितीचा अहवाल अंतिम तयारीच्या अवस्थेत असून, लवकरच या प्रकरणातील अनेक मुखवटे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून समितीने तपशीलवार चौकशी सुरू केली आहे. नागपूरच्या शिक्षण विभागातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी तसेच काही कर्मचारी यांच्यासह पुण्यातील अधिकाऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत चार वर्तमान आणि माजी शिक्षण उपसंचालकांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर तीन शाळा चालक, एक शिक्षक आणि सुमारे ७ ते ८ शासकीय कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. तरीही काही आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे.
शालार्थ प्रणालीतील बनावट आयडी तयार करून खोट्या शिक्षकांची नियुक्ती केली जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर हा घोटाळा समोर आला. या प्रकरणाची चौकशी प्रशासनिक पातळीवर तर सुरू आहेच, पण सदर पोलिस, सायबर क्राइम युनिट आणि एसआयटी या यंत्रणांनीही स्वतंत्र तपास सुरू केला आहे.
राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर गालबोट लावणाऱ्या या घोटाळ्याची अंतिम चौकशी अहवाल लवकरच सादर होण्याची शक्यता असून, यात काही ‘मोठ्या’ नावांचा समावेश होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.