नवी दिल्ली:शालेय शिक्षण विभागाने अलीकडेच शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता या निर्णयाचा पुन्हा आढावा घेऊन ती परीक्षा पूर्वीप्रमाणे चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्याचा विचार करावा, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत.
या बदलाची अंमलबजावणी यावर्षीपासूनच करण्यासाठी विभागाने तयारी सुरू करावी, असेही भुसे यांनी स्पष्ट केले आहे. याआधीही गणवेश खरेदी आणि पुस्तक-वही वाटपासंबंधी घेतलेले निर्णय त्यांनी मागे घेतले होते.
पूर्वी चौथीसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा पाचवीसाठी तर सातवीची परीक्षा आठवीसाठी करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा पूर्वस्थितीला परतण्याच्या सूचना भुसे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.
दादा भुसे म्हणाले, “शिष्यवृत्ती लवकर मिळाल्यास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि आर्थिक मदतीचा फायदा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल.”
शिष्यवृत्ती योजनांमध्ये वाढ अपेक्षित-
मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत विविध शिष्यवृत्ती योजना व त्यातून लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा झाली. अनेक वर्षांपासून शिष्यवृत्ती संख्येमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे गुणवत्ताधारक अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करावा, असेही निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले.