नागपूर: नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशनचा (Netaji Subhash Chandra Bose Itwari Railway Station) पुनर्विकास पूर्ण झाला असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्च्युअल पद्धतीने गुरुवारी केले. या प्रसंगी त्यांनी इतवारी रेल्वे स्थानकासह गोंदिया जंक्शनचाही लोकार्पण सोहळा पार पाडला.
१२.३९ कोटींच्या खर्चातून झाले पुनर्विकासाचे काम-
‘अमृत भारत योजना’ अंतर्गत इतवारी स्थानकाचा आधुनिक पद्धतीने पुनर्विकास करण्यात आला आहे. यामध्ये स्थानकाचा प्रवेशद्वार अधिक आकर्षक बनविण्यात आला असून, परिसरातील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था विस्तारित करण्यात आली आहे. याशिवाय, प्रवाशांसाठी आधुनिक प्रतीक्षालये, विश्रांती कक्ष, दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा, तसेच उन्नत सीसीटीव्ही प्रणालीच्या माध्यमातून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
यासोबतच, बुकिंग कार्यालयाचा देखील पुनर्विकास करण्यात आला असून, प्लॅटफॉर्मवरील शेल्टरचे क्षेत्र वाढवण्यात आले आहे. अनेक प्रवासी-केंद्रित सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक व सुलभ झाला आहे. हे स्थानक आता आधुनिक आणि सर्वसुविधांनी युक्त अशा स्वरूपात विकसित करण्यात आले आहे.