नागपूर : “I Love You” असं म्हणणं केवळ त्या वक्तव्यावरून अश्लीलता किंवा लैंगिक छळ मानता येणार नाही, असं स्पष्ट करत बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण आणि समाजाच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फडके यांच्या खंडपीठाने एका शिक्षकाविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करत हा निर्णय दिला.
प्रकरण नेमकं काय?
एका महिला शिक्षकेनं आपल्या पुरुष सहकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती की, तो वारंवार तिला “I Love You” म्हणतो, त्यामुळे ती अस्वस्थ होत होती. हा प्रकार तिनं लैंगिक छळ असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार संबंधित शिक्षकाविरोधात IPC कलम 354 (महिलेच्या शीलभंगाचा प्रयत्न), कलम 509 (शब्द अथवा हावभावाने महिलेच्या प्रतिष्ठेला ठेस पोहोचवणे) आदी कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.
कोर्टाने काय म्हटलं?
आरोपी शिक्षकाने आपल्यावरील आरोप खोटे आणि हेतुपुरस्सर असल्याचे सांगत हायकोर्टात धाव घेतली होती आणि एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. यावर निर्णय देताना कोर्टाने स्पष्ट केलं की,I Love You’ हे म्हणणं केवळ त्या म्हणण्यामुळेच गुन्हा ठरत नाही, जोपर्यंत त्यात जबरदस्ती, शारीरिक संपर्क किंवा सतत पाठलाग असणारं वर्तन नाही.”
कोर्टाने हेही अधोरेखित केलं की, संबंधित महिलेने तक्रारीत कुठेही हे नमूद केलेलं नाही की आरोपीने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला किंवा अशोभनीय हावभाव केले. त्यामुळे याला फक्त एक वैयक्तिक भावना समजून चालावे लागेल.प्रत्येक अस्वस्थ करणारी गोष्ट गुन्हा ठरत नाही. कायद्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी न्यायसंस्था सतर्क आहे,” असं म्हणत कोर्टाने एफआयआर रद्द केला.
या निर्णयामुळे लैंगिक छळ आणि अश्लीलतेच्या आरोपांबाबत न्यायालयीन व्याख्या अधिक स्पष्ट झाली आहे. केवळ भावना व्यक्त केल्यामुळे ती अश्लील ठरवता येणार नाही, असं स्पष्ट करत न्यायालयाने समाजातील अति-संवेदनशीलतेला कायद्याच्या चौकटीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.