
नागपूर– विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत साहित्याशी थेट संबंध नसलेल्या घटकांचा वाढता हस्तक्षेप गंभीर चिंतेचा विषय असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक व अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले आहे. राजकीय पाठबळ आणि व्यापारी हितसंबंधांच्या जोरावर काही लोक संस्थेत प्रवेश करत असून, त्यांचा हेतू साहित्यसेवा नसून संघाच्या इमारत व मालमत्तेवर नियंत्रण मिळवण्याचा असल्याचा आरोप त्यांनी केला.
नागपुरातील टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. जोशी म्हणाले की, जशा क्रीडा संस्था खेळाडूंनी चालवाव्यात, तशाच साहित्य संस्था साहित्यिकांच्या हातीच राहायला हव्यात. मात्र सध्याच्या निवडणुकीत साहित्य क्षेत्राबाहेरील लोक सक्रिय झाल्याने शंभर वर्षांची गौरवशाली साहित्यिक परंपरा धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
या वेळी पीडीकेव्हीचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, विनोद देशमुख, मेघना वाहोकर, वसंत वाहोकर, प्रकाश दुलेवाले, विलास देशपांडे यांच्यासह अध्यक्ष व कार्यकारी मंडळ सदस्यपदाचे उमेदवार प्रमोद भुसारी उपस्थित होते. डॉ. श्रीपाद जोशी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधील एकूण २२ कार्यकारी मंडळ सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.
निवडणुकीदरम्यान काही उमेदवारांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठिंब्याचा प्रचार केला जात असल्यावरूनही डॉ. जोशी यांनी नाराजी व्यक्त केली. साहित्य संस्थेच्या निवडणुकीत राजकीय नावांचा वापर करणे अयोग्य असून, साहित्य संस्था या सत्ताकेंद्र नसून सेवाभावी आणि सांस्कृतिक व्यासपीठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यमान कार्यकारिणीवर टीका करताना डॉ. जोशी म्हणाले की, सध्याच्या कार्यकारिणीने आपल्या कार्यकाळात वाङ्मयीन उपक्रमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. मराठी भाषेचा अभिजात दर्जा, भाषा व संस्कृती संवर्धन यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. कार्यकारिणीचे काम केवळ इमारत आणि मालमत्ता सांभाळणे नसून साहित्यिक चळवळीला दिशा देणे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अखेर त्यांनी साहित्यिकांना आवाहन करत म्हटले की, “साहित्य संस्था वाचवा, विदर्भ साहित्य संघ वाचवा. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आणि त्यांच्या पॅनेलमधील सर्व २२ कार्यकारी मंडळ सदस्यांना मतदान करून साहित्यिकांच्या हातीच ही संस्था द्या.”








