Published On : Fri, Jul 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘सावरकरांना इंग्रजांनी छळलं, आता आपण तरी अवमान करू नका’; विधानसभेत मुनगंटीवारांनी सरकारलाच सुनावलं

Advertisement

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेत गाजला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सरकारवरच नाराजी व्यक्त करत सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव अद्याप सभागृहात का आणला गेला नाही, असा सवाल उपस्थित केला.

विधानसभेत बोलताना मुनगंटीवार यांनी संसदीय कामकाज मंत्री जयकुमार रावल यांच्यावर थेट निशाणा साधला. यापूर्वी सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस करणारा ठराव आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सध्याच्या कामकाज पत्रिकेत त्याचा कोणताही उल्लेख नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रजांनी अमानुष यातना दिल्या. आता आपण तरी त्यांचा अवमान करू नये. त्यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव इतका का रखडला आहे? फाईलला इतक्या यातना का दिल्या जात आहेत?” असा सवाल करत मुनगंटीवार यांनी सरकारला जाब विचारला.

भाजपच्या जाहीरनाम्यातही सावरकरांना भारतरत्न देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, याची आठवण करून देत त्यांनी, “सत्ता आल्यानंतर आश्वासनांचा विसर पडता कामा नये. सावरकरांच्या विचारांवर आम्ही राजकारण केले, कार्यकर्ता म्हणून काम केले. मग आपल्या सरकारकडूनच हा प्रस्ताव प्रलंबित राहणे योग्य नाही,” अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.

Advertisement

मुनगंटीवार यांच्या भूमिकेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिले. सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव अधिक व्यापक चर्चेनंतर मांडण्याचा निर्णय घेतला असून, पुढील अधिवेशनात हा प्रस्ताव सभागृहात आणला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, विधानसभेत अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीच्या घटनेवरूनही जोरदार चर्चा झाली. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जयंत पाटील यांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. या चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनीही आपली भूमिका मांडत या विषयावर सखोल चौकशीची गरज व्यक्त केली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.