Published On : Sun, May 31st, 2020

विलगीकरण केंद्रातील नागरिकांसाठी सात्विक आणि सकस आहार

मनपाला राधास्वामी सत्संगचे सहकार्य : शेकडो स्वयंसेवकांचे सेवाकार्य

नागपूर : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर नागपुरात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रातील नागरिकांची काळजी नागपूर महानगरपालिका जबाबदारीने घेत आहे. सध्या सर्व केंद्रातील नागरिकांना सात्विक आहार पुरविला जात असून राधास्वामी सत्संग ब्यासचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या आणि प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना विलगीकरण केंद्रात ठेवले जाते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्यांची व्यवस्था करण्यासोबतच त्यांना त्रास होऊ नये याचीही पुरेपूर काळजी घेतली जाते. सध्या नागपुरात ११ विलगीकरण केंद्र असून त्याची क्षमता तीन हजारांवर आहे. भविष्यातील व्यवस्था म्हणून राधास्वामी सत्संग कळमेश्वर रोड येथे सुमारे पाच हजार क्षमतेचे ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या ११ विलगीकरणं केंद्रात नागपुरातील विविध प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक असून त्यांना आता जे सात्विक भोजन पुरविले जाते, ते कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग ब्यास येथील स्वयंपाकगृहात तयार केले जाते व वेळेत संपूर्ण काळजी घेत पोचविले जाते.

निर्जंतुकीकरण, स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य
राधास्वामी सत्संग येथील भव्य स्वयंपाकगृहात विलगीकरण केंद्रातील सुमारे तीन हजार नागरिकांसाठी दररोज स्वयंपाक तयार होतो. स्वयंपाकगृहात प्रवेश करताना हात धुवूनच प्रवेश केला जातो. येथील भांडारगृहातील स्वच्छता चोख आहे. संपूर्ण स्वयंपाकगृह कुठल्याही स्वच्छतेला लाजवेल असेच आहे. येथे सेवा देणारे सर्व सेवाकरी अप्रोन, मास्क, हेअर कॅप, हॅण्डग्लोवज आदींचा वापर करतात. प्रत्येक सेवाकऱ्याला त्यांची जबाबदारी सोपविलेली असते. प्रवेश करताना हात धुतले की नाही हे बघण्याच्या जबादारीपासून भांडे धुणे, पोळ्या लाटणे, स्वयंपाक करणे, पॅकिंग करणे, फूड पॅकेट कॅरेटमध्ये भरणे, ते गाड्यांपर्यंत नेणे, त्याची नोंद घेणे, रिकाम्या कॅरेट्सला सॅनिटाईज करणे ह्या प्रत्येक स्वतंत्र जबाबदाऱ्या असून प्रत्येक सेवाकरी आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहे. हे स्वयंपाकगृह, तेथील व्यवस्था आणि सेवेकरी लोकांचे समर्पण बघितल्यानंतर विलगीकरण केंद्रात देण्यात येणाऱ्या भोजनाचा दर्जा काय, याची प्रचिती येईल.

व्यावसायिक कुटुंबियांची सेवा
राधास्वामी सत्संग व्यासच्या सेवाकार्यासाठी नागपुरातील पुढाकार घेणारे अनुयायी उच्चभ्रू कुटुंब, उद्योजक, व्यावसायिक आहेत. या सर्वांचे अख्खे कुटुंब पहाटे ४ वाजता राधास्वामी सत्संग ब्यास येथे येतात. कुटुंबातील लहानांपासून वृद्ध व्यक्तींपर्यत प्रत्येक सदस्य मनोभावे सेवा देत आहेत. ही सर्व मंडळी निःस्वार्थ भावनेने कार्य करीत आहे, असे येथील प्रमुख श्री.धरमपाल नागपाल यांनी सांगितले. यासाठी त्यांना कुठलिही प्रसिद्धी अपेक्षित नसून मानवसेवा हीच सर्वोच्च सेवा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राधास्वामी सत्संग ब्यासच्या संपूर्ण देशातील केंद्राच्या माध्यमातून दररोज सुमारे १३ लाख फूड पॅकेट्स वितरित केले जात आहेत.

बालकांसाठीही विशेष फूड पॅकेट्स
विलगीकरण केंद्रातील नागरिकांना सात्विक आणि सकस आहार मिळावा याकडे त्यांचा कटाक्ष आहे. दररोज वेगवेगळ्या भाज्या असाव्यात, पोळ्यांना तूप लावलेले असावे, याचीही काळजी घेतली जाते. विशेष म्हणजे विलगीकरण केंद्रात लहान मुलेही असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र फूड पॅकेट्स तयार केले जातात.


नागरिकांची काळजी ही मनपाची जबाबदारी : मनपा आयुक्त
विलगीकरण केंद्रातील नागरिकांची काळजी ही मनपाची जबाबदारी आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या भोजनाबद्दल कुणी शंका घेण्याचे कारण नाही, अशी व्यवस्था आहे. राधास्वामी सत्संग ब्यास ही एक सेवाभावी संस्था असून येथील प्रत्येक सेवाकरी समर्पणाची भावना ठेवून कार्य करतात. तेथील स्वच्छता चोख अशी आहे. विलगीकरण केंद्रातील नागरिकांनी प्रशासनावर विश्वास ठेवून सहकार्य करावे, तेथील सुविधांबाबत वेळोवेळी अधिका-यांमार्फत आवश्यक पर्यवेक्षण केल्या जात असल्याने अनुषंगीक चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.