| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Feb 23rd, 2018

  माजी मंत्री सतीश चतुर्वेदींची काँग्रेसमधून हकालपट्टी

  नागपूर : मागे झालेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया व पक्षशिस्तीचा भंग केल्याचा आरोप करत काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेस पक्षातूनच काढण्यात आले आहे. सोबतच त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी या संबंधिचा आदेश जारी करण्यात आला. विशेष म्हणजे माजी मंत्री राहिलेल्या विदर्भातील एखाद्या नेत्याला पक्षातून काढून टाकण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.

  प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने संबंधीत आदेश जारी करण्यात आला असून प्रदेशाध्यक्षांनी तसा निर्णय घेतल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. ही कारवाई चतुर्वेदींसाठी धक्कादायक यामुळे चव्हाण यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करणाऱ्या इतर नेत्यांच्याही तोंडाचे पाणी पळाले आहे. तर नागपुचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांची पक्षातील ताकद आणखी वाढल्याचेही स्पष्ट झाले आहे.

  महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे करणे तसेच पक्ष विरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत चतुर्वेदी यांना शहर काँग्रेसतर्फे २५ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीच स्पष्टीकरण सात दिवसाच्या आत चतुर्वेदींना द्यायचे होते. मात्र, चतुर्वेदी यांनी मुदत संपूनही स्पष्टीकरण सादर केलेले नाही. याची दखल घेत शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला. या अहवालात चतुर्वेदी यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यावेळी शहर काँग्रेसला कुणालाही नोटीस पाठविण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद चतुर्वेदी यांनी केला होता. तर कारवाई होवूच शकत नाही, असा छातीठोकपणे दावा चतुर्वेदी यांचे समर्थक करीत होते. मात्र, आता चतुर्वेदी यांना पक्षातून निष्काशित करण्यात आल्यामुळे शहर काँग्रेसने बजावलेली नोटीस ही प्रदेशाध्यक्षांच्या आदेशावरूनच होती, हे स्पष्ट झाले आहे.

  दरमान्य चतुर्वेदींना आपल्यावर कारवाई होणार हे समजल्यानंतर त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांची भेट घेतली असल्याची चर्चा होती. आता काँग्रेसने चतुर्वेदींना पक्षातूनच बेदखल केल्याने गडकरी चतुर्वेदी भेटीच्या बातमीला बळ मिळाले आहे. मात्र या भेटीत गडकरींकडून चतुर्वेदींना कुठले आश्वासन देण्यात आले याबाबत कुठलीही माहिती बाहेर आली नाही.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145