Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Sep 13th, 2019

  माझं स्वप्न खरं झालं !

  ‘बस स्टॉप’, ‘आम्ही बेफिकर’, ‘कृतांत’, ‘शेंटिमेंटल’ अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला युवा चेहरा म्हणजे सुयोग गोऱ्हे. सुयोग लवकरच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही भूमिका कशी मिळाली, याबद्दल सुयोग म्हणतो, हा खरं तर एक गंमतीदातर किस्सा आहे. मी हेमंतला माझ्या पहिल्या चित्रपटापासून म्हणजेच ‘बस स्टॉप’पासून ओळखतो.

  ‘सातारचा सलमान’ची संहिता मला माहीत होती आणि या चित्रपटाचा आपणही एक भाग असावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेसाठी मी तिथे ऑडिशनला गेलो होतो. मी त्या व्यक्तिरेखेची वाक्यं बोलत असतानाच हेमंतने मला थांबवलं आणि म्हणाला काय करतोस तू? तुला मुख्य नायकाची वाक्यं बोलायची आहेत. हे ऐकून मला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला आणि त्यांनतर अमित काळभोर साकारण्याची संधी मला मिळाली. या चित्रपटाची एक टॅगलाईन आहे ‘स्वप्नं बघितली तरच खरी होतात’ आणि हे माझ्या बाबतीत अगदी खरं ठरलं.

  व्यावसायाने डॉक्टर असणाऱ्या सुयोगचा आणि अमितचा प्रवास बऱ्याच अंशी सारखा आहे. सुयोग ही व्यक्तिरेखा वैयक्तिक आयुष्यातही जगला आहे. त्यामुळे ही भूमिका त्याच्या खूप जवळची आहे. या व्यक्तिरेखेसाठी त्याने थोडी मेहनतही घेतली आहे. याविषयी सुयोग सांगतो, ” मुळात मी गावातून आलो आहे.

  चित्रपटसृष्टीबद्दल मला पूर्वीपासूनच खूप आकर्षण होतं, त्यामुळे एखादं पोस्टर पाहिल्यावर मी अनेकदा मित्रांना म्हणायचो, ‘आपलं पोस्टर असं कधी लागेल? अखेर माझी ही इच्छा पूर्ण झाली. अमित आणि माझ्या वैयक्तिक कथेत साम्य जरी असले तरी हे पात्र साकारताना मी थोडी मेहनतही घेतली आहे. विशेष म्हणजे मी पहिल्यांदाच अशी हेअरस्टाईल केली. या भूमिकेसाठी माझ्या देहबोलीत बदल करणे आवश्यक होते. याशिवाय मी आठ किलो वजनही कमी केले. हे सगळं माझ्यासाठी आव्हानात्मक अजिबात नव्हते, खूप मजेशीर आणि आनंददायी अनुभव होता हा.

  ”पुढे सुयोग म्हणतो, ” प्रेमकहाणी, नाट्य आणि ॲक्शन अशा सर्वच गोष्टींनी भरलेला हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. ९० च्या काळात जसे गोविंदाचे चित्रपट होते तशाच पद्धतीचा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा अनुभव माझ्यासाठी खूपच अनोखा होता. एक कलाकार म्हणून मी समृद्ध झालो. या चित्रपटाच्या निमित्ताने मी माझे स्वप्न जगतोय, अशीच भावना या क्षणी माझ्या मनात आहे.

  हेमंत सोबत काम करण्याच्या अनुभव कसा होता विचारल्यावर सुयोगचं उत्तर आलं, ” एक दिग्दर्शक म्हणून हेमंत खूपच शिस्तीचा आणि कडक आहे. कामाच्या बाबतीत तो खूपच काटेकोर असतो. सेटवर त्याची टिंगलटवाळी कधीच नसते आणि हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. कारण अशा हेमंतला मी कधी बघितलंच नव्हतं. त्यामुळे माझा गोंधळ व्हायचा, की सेटवर याच्याशी कसं वागायचं? एकतर मी त्याला एरव्ही ‘ढोम्या’ म्हणतो आणि सेटवर असं बोलणं योग्य नाही. त्यात ‘सर’ बोलणं खूपच औपचारिक वाटतं. अखेर मध्यस्थी करत मी सेटवर त्याला ‘ऐक ना भावा’ असं म्हणायचो.”


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145