Published On : Sat, Mar 9th, 2019

गावांच्या विकासामध्ये सरपंचांचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

नवराष्ट्र सरपंच सम्राट आणि ॲग्रीटेक पुरस्कार वितरण समारंभ

नागपूर: पंचायतराज व्यवस्थेमध्ये गाव मुख्य घटक असून गावांच्या विकासामध्ये सरपंचांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हॅाटेल ला मेरीडीयन येथे नवराष्ट्र सरपंच सम्राट अॅग्रीटेक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रिय परिवहनमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाने, खनिकर्म विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल, रितू छाब्रिया, चंद्रपाल चौकसे, युवराज ढमाले, हेमांग पारीख, निमिष माहेश्वरी, वैभव माहेश्वरी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रगतीशील सरपंच सन्मान, सर्वश्रेष्ठ सरपंच सन्मान, महासरपंच सन्मान या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘नवराष्ट्र’ने आयोजित केलेला सरपंच सन्मान पुरस्कार सोहळा हा अभिनव उपक्रम आहे. पंचायतराज व्यवस्थेत गाव व ग्रामपंचायत हे महत्त्वाचे घटक असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच गावाला एकत्रित ठेवतात, यासाठी त्यांचे मोलाचे योगदान ठरते. गावाच्या विकासामध्ये मोलाची भूमिका बजावणारे सरपंच हे ग्रामविकासाचे खरेखुरे दूत आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

जलसंधारणाच्या विविध कामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गंत राबविण्यात आलेली जलसंधारणाची विविध कामे गावपातळीवर सरपंचांच्या मोलाच्या योगदानामुळे यशस्वी ठरली आहेत. जलयुक्त शिवार अभियानाला लोकसहभागाची जोड मिळाल्यामुळे ही लोकचळवळ बनली. याद्वारे 16 हजार गावे जलसमृद्ध झाली आहेत. यामुळे दुष्काळी स्थितीवर मात करता येणे शक्य झाले आहे. गावा-गावांतील टॅंकरची संख्या कमी झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गंत गावकऱ्यांनी ही किमया करून दाखवली आहे. मागील वर्षी 83 टक्के पर्जन्यमानावरही विक्रमी उत्पादन घेणे हे केवळ आश्वासित सिंचनक्षमता वाढल्यामुळेच शक्य झाले. त्यामुळे बागायती क्षेत्रही वाढते आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गंत 35 हजार तलाव गाळमुक्त करण्यात येत आहेत. हा गाळ शेतशिवारात टाकल्याने जमिनीची सुपिकता आणि धरणांची साठवणक्षमता वाढणार आहे. दीड लाख शेततळी तसेच सिंचन विहिरींच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. सहा लाख शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात आल्या असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळू शकतो. याद्वारे रोजगार निर्मितीलाही चालना मिळत आहे. यामुळे शेतीही शाश्वत होणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करणे तसेच तीन लाख जणांना कृषी व कृषीपूरक विषयातील कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. याद्वारे गावागावांमध्ये कृषीपूरक व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आगामी काळात कृषीक्षेत्रातही आर्टीफिशीयल इंटेलीजन्सचा समावेश होणार आहे. सहा जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील प्रकल्प सुरू करण्यात आला असून, यामध्ये पेरणीपासून ते कापणीपर्यंत सर्व प्रक्रिया तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रित करण्यात येत आहे. ड्रोन आणि सॅटेलाईट तंत्रज्ञानाचाही यामध्ये वापर करण्यात येत आहे. दोन हजार स्वयंचलीत हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांपर्यंत हवामानासंदर्भातील अंदाज अचूक व वेळेत पोहचविता येऊ शकतो आहे. माती परीक्षण, पिकांवर पडणारे रोग यासारखे विषयही यामध्ये अंतर्भूत आहेत. शेतकऱ्यांना बाजारपेठेतील स्थितीची व बाजारभावांची अद्यावत माहिती देण्यात येत आहे. याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होणार आहे. सिंचन, तंत्रज्ञान व हमीभाव याद्वारे शेती शाश्वत व गाव समृद्ध करण्यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

ग्रामविकासासंदर्भांत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जवळपास 42 हजार गावे असून 29 हजार ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. मागील साडेचार वर्षापासून ही सर्व गावे स्वयंपूर्ण व्हावीत, त्यांचा शाश्वत विकास व्हावा, यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गंत ग्रामीण भागात 30 हजार किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले आहे. 18 हजार गावांमध्ये पेयजल योजना तयार करण्यात आल्या आहेत. 14व्या वित्त आयोगांतर्गंत ग्रामपंचायतींना निधी थेट उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यातून गावामध्ये ग्रामविकासाच्या विविध योजना साकार होत आहेत. याद्वारे ग्रामपंचायती सक्षम होत आहेत. गावातील सेवा सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठीही पुढाकार घेण्यात आला असून, जागतिक बॅंकेच्या सहकार्याने 10 हजार गावातील सेवा संस्थांना कृषीपूरक व्यवसाय सुरू करून देवून त्यांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. सरपंचांच्या मानधनासह विविध मागण्या मान्य करण्यात आल्या असून, सरपंचांचे मानधन 5 हजार करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर कामगिरीवर आधारीत वाढीव मानधन देण्यात येणार आहे. सरपंचांच्या सक्षम नेतृत्वामुळेच गावात परिवर्तन घडू शकते. ग्रामविकासामध्ये महिलांचे व महिला सरपंचांचे योगदानही मोलाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गाव हा लोकशाहीचा कणा असून गावांच्या विकासाद्वारे देशाचा विकास घडू शकतो. आजही ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या मोठी आहे. परंतु रोजगाराच्या शोधात शहराकडे होणारे स्थलांतरही वाढते आहे. हे थांबविण्याची गरज असून यासाठी गावातील पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उपयुक्त ठरली. ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविणे व गावाचा सर्वंकष व शाश्वत विकास घडविणे गरजेचे आहे. पिकपद्धतीत बदल करून गावा-गावांमध्ये बांबूचे तसेच जैव इंधनासाठी लागणाऱ्या पिकांचे उत्पन्न घेणे गरजेचे असल्याचेही श्री. गडकरी यांनी सांगितले.

रितू छाब्रिया म्हणाल्या, गावपातळीवर गावाच्या विकासामध्ये सरपंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. गावाच्या विकासामध्ये महिलांचे स्थानही महत्त्वपूर्ण असून त्यांचे सबलीकरण होणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागाच्या सशक्तीकरणासाठी विविध संस्था व संघटना काम करीत असल्याचे उल्लेखनीय आहे, असेही छाब्रिया यांनी सांगितले.

प्रास्ताविकात धनराज गावंडे म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांशी संपर्क साधून तेथील समस्या जाणून घेण्यात येत आहेत. ग्रामीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून सामाजिक बांधिलकी जपत यापुढची वाटचाल करण्यात येणार असल्याचे श्री. गावंडे यांनी सांगितले.

यावेळी कृषी व कृषीपूरक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या अनिल कोटेचा, शरद पाटील, जि. कोल्हापूर, उज्ज्वल कोठारी, जि. सोलापूर, श्रीमती रिचा नायर सिन्नर जि. नाशिक, अंकुश मोगल व डॉ. तुषार देवरस जि. पुणे यांचा तर सरपंच सम्राट अभय ढोकणे, आमगाव जि. नागपूर, उच्चशिक्षित सरपंच डॉ. शरद रणदिवे, नागला जि. चंद्रपूर, सर्वश्रेष्ठ सरपंच गणेश ताठे, खामगाव, जि. बुलडाणा आणि महासरपंच सम्राट श्रीमती माधुरी घोडमारे जि. नागपूर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सूत्रसंचालन रेणूका देशकर यांनी केले.