Published On : Tue, Apr 6th, 2021

सरपंचांचा संकल्प गावाच्या लसीकरणाचा !

कळमेश्वर तालुक्यात साठ टक्के उद्दिष्ट पूर्ण

नागपूर : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण गावावर येणारे संकट टाळण्यासाठी तसेच गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लसीकरण पूर्ण करण्याचा संकल्प कळमेश्वर तालुक्यातील सर्व सरपंचांनी केला आहे. तालुक्यातील 12 गावे कोरोनामुक्त आहेत. तर 86 गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे स्वयंस्फूर्तीने प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यात आल्या असून तालुक्यात 60 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळमेश्वर येथील तहसील कार्यालयात सोशल डिस्टन्सिंग पाळत सरपंचांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच पन्नासपेक्षा जास्त गावातील सरपंचांनी उपस्थिती दर्शवित माझे गाव, संपूर्ण लसीकरण असलेले गाव म्हणून ओळख निर्माण करण्याचा संकल्प केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, माहिती विभागाचे माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर, ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र ढवळे, तहसीलदार सचिन यादव, खंड विकास अधिकारी महेश्वर डोंगरे आदी उपस्थित होते.
कळमेश्वर तालुक्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यासोबतच कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविणे तसेच 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत असलेला गैरसमज दूर करुन लसीकरणासाठी पात्र नागरिकांना प्रवृत्त करुन त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी गावातील सरपंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गावाचा प्रमुख म्हणून प्रत्येक सरपंचाने या विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन श्री. भुयार यांनी नागरिकांना यावेळी केले.

लसीकरणासंदर्भातील नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर गावनिहाय मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये लोक सहभाग वाढविण्यासाठी गावातील सरपंच व इतर पदाधिकारी यांनी पुढाकार घेवून नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी स्वीकारावी. तसेच माझे गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तालुक्यात 19 हजार 706 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून यापैकी 60 वर्षांवरील 8 हजार 451 नागरिकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. 45 वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस देण्याच्या दृष्टीने गावांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी. तसेच गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सचिन यादव यांनी केले. कोरोना लसीकरणासाठी तसेच कोविड नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यात आले.

तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यात रुग्णांची संख्या वाढली असून त्याप्रमाणात चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. मार्च महिन्यात सर्वाधिक 1 हजार 684 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून एप्रिलमध्ये 509 रुग्ण कोरोनाबाधित होते. यामध्ये सरासरी 16 हजार अति जोखमीचे तर 18 हजार 800 रुग्ण कमी जोखमीचे रुग्ण वाढीमध्ये 15.79 टक्के रुग्ण तर एप्रिलमध्ये 16.23 टक्के रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे तालुक्यात आतापर्यंत 58 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी कोरोनावरील लस प्रभावी व परिणामकारक असून तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंचांच्या बैठकीत करण्यात आले. गाव सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याचे सर्व सरपंचांनी यावेळी सांगितले.

श्री. महेश्वर डोंगरे यांनी आभार मानले.