Published On : Fri, May 19th, 2017

म.न.पा. सतरंजीपुरा झोनमधील सफाई कर्मचाऱ्यांना साड्या व शर्ट वितरण


नागपूर:
स्थायी समितीचे माजी सभापती व नगरसेवक प्रवीण भिसीकर यांच्या पुढाकाराने कामगार दिनाचे औचित्य साधून झोनमधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना साड्या व शर्टचे वितरण करण्यात आले. श्रीफळ, मिठाई आणि तुळशीचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

ह्या हृद्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, झोन सभापती संजय चावरे, श्रीमती अभिरुची राजगिरे, नगरसेविका दुर्गाताई हत्तीठेले, सहायक आयुक्त प्रकाश वराडे उपस्थित होते.

सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा खोपडे म्हणले, स्वच्छ नागपूर आणि सुंदर नागपूर हे ब्रीद साध्य करण्यात सफाई कर्मचाऱ्यांचा वाटा मोलाचा आहे. दिवसरात्र या शहराच्या स्वच्छतेसाठी हे कामगार झटत असतात. त्यांच्या कार्याची दखल कामगार दिनाच्या निमित्ताने घेतली, याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर नागपूरचे आमदार डॉ, मिलिंद माने म्हणाले, नागपुरात स्वच्छतेचे कार्य इमानेइतबारे करणारे सफाई कर्मचारी हे खऱ्या अर्थाने या शहराचे ‘स्वच्छतादूत’ आहेत. त्यांचा गौरव हा त्यांचे मनोबल वाढविण्यासाठीचा स्त्युत उपक्रम असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.


मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे म्हणाले, स्थायी समितीचे सभापती व नगरसेवक प्रवीण भिसीकर यांनी पुढाकार घेऊन राबविलेला उपक्रम अभिनंदनीय आहे. केवळ एका झोनमध्येच नव्हे तर सर्व झोनमधील सफाई कर्मचाऱ्यांचा असा सत्कार करणे म्हणजे स्वच्छ नागपूर अभियानात एक पाऊल पुढे टाकल्यासारखे होईल. यानिमित्ताने सफाई कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढेल, यात शंका नाही.

प्रारंभी सवर पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजक ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण भिसीकर यांनी केले. कार्यक्रमानंतर झोनतर्फे सर्व कर्मचाऱ्यांकरिता भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाला दिलीप गौर, मुरलीधर नागपुरे, सोनू मिश्रा, राजेश शाहू, राजेश कुंभारे, किसन नंदनवारे, जितेंद्र मोहाडीकर, नेताजी गजभिये, कृष्णानंद उपाध्याय, आरोग्य विभागाचे वि.अ.श्री. राजूरकर, रविकांत डेलीकर, मनोज खरे, अजय मलिक प्रामुख्याने उपस्थित होते.