Published On : Thu, Jan 23rd, 2020

प्राथमिकमध्ये यशोधरा नगर तर माध्यमिक गटात संजयनगर शाळा प्रथम

बालकदिन व शिक्षण सप्ताहाचा समारोप : केंद्र स्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान

नागपूर: ‘बालकदिन’ व ‘शिक्षण सप्ताह’निमित्त आयोजित केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राथमिक गटामध्ये यशोधरानगर हिंदी उच्च प्राथमिक शाळा तर माध्यमिक गटात संजयनगर माध्यमिक शाळा संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘बालकदिन’ व ‘शिक्षण सप्ताह’चा बुधवारी (ता.२२) समारोप झाला. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आयोजित समारोपीय कार्यक्रमात उपमहापौर मनीषा कोठे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षण समिती सदस्या रिता मुळे, सदस्य मो. इब्राहिम तौफिक अहमद, क्रीडा समिती सदस्य सुनील हिरणवार, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे, राजेंद्र सुके, क्रीडा नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, क्रीडा शिक्षक नरेश सवाईथुल, राजेंद्र डोळके, बंडू नगराळे, सुनील डोईफोळे, बाळा बन्सोड, स्नेहा भोतमांगे, संध्या भगत, साधना टिचकुले, मंगला डहाके, रत्ना जिचकार, निलीमा दुरूगकर, वैशाली रागीटे, दिपक सातपुते, अभय दिवे, साहेबराव गावंडे, गेंदलाल बुधवावरे, ईश्वर पवार आदी उपस्थित होते.

‘बालकदिन’ व ‘शिक्षण सप्ताह’निमित्त दहा झोनमधील शाळांची प्रत्येकी दोन दोन झोनमध्ये विभागणी करून सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. पाचही झोन स्तरीय विजयी संघांच्या केंद्रीय स्तरावर स्पर्धा धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.

केंद्र स्तरावरील विजेत्या संघांमध्ये प्राथमिक गटात (वर्ग १ ते ४) यशोधरानगर हिंदी उच्च प्राथमिक शाळा तर माध्यमिक गटात (वर्ग ५ ते ८) संजयनगर माध्यमिक शाळा संघाने बाजी मारली. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते विजयी चषक व पारितोषीक प्रदान करून गौरविण्यात आले.

याशिवाय स्पर्धेतील इतर विजेत्या संघांना २० चषक व वैयक्तिक गटामध्ये ६० चषक प्रदान करण्यात आले. यापूर्वी झालेल्या झोन स्तरावरील क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या व वैयक्तिक गटातील खेळाडूंना एकूण १८०० पदक देउन सन्मानित करण्यात आले.

समारोपिय कार्यक्रमाचे संचालन मधु पराड यांनी केले तर आभार क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी मानले.