Published On : Thu, Jan 23rd, 2020

“नासुप्र’च्या पुनरुज्जीवनाचा शासनाचा घाट

जोशी, दटकेंनी नोंदविला धिक्कार : पालकमंत्र्यांच्या कृतीचा निषेध

नागपूर : शहराचा सत्यानाश करणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीची प्रक्रिया फडणवीस सरकारच्या काळात सुरू झाली. निम्म्याहून अधिक फाईल्स व कमांचे हस्तातरणसुद्धा महापालिकेला झाले आहे.

असे असताना पालकमंत्री नितीन राऊत यांनी नासुप्रची पुन्हा नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्याबाबत पत्र दिले आहे. त्यांच्या मागणीचा महापौर संदीप जोशी आणि भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी आज संयुक्‍त पत्रकार परिषद घेत धिक्कार नोंदविला.


नासुप्रने रस्ते, नाले, मैदान विकून खाल्ले. नागपूरकरांचे “हरॅसमेंट’ केले. 4-5 ट्रस्टी मिळूनच सर्व निर्णय घ्यायाचे. 1 रुपये चौरसफुट दराने जागा लाटण्यात आल्या. याभागात नगरसेवकही विकासकामे करून शकत नव्हते.

सर्वसामान्यांची अडचण लक्षात घेऊनच मनपा सभागृहाने नासुप्र हटविण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने नासुप्र हटविण्याची कारवाई सुरू केली.

सत्तेत येताच पालकमंत्री नितीन राऊत यांनी नासुप्रच्या पुनरुज्जीवनासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. त्या आधारे कार्यासन अधिकारी अशोक खांडेकर यांनी महानगरपालिकेला पत्र देऊन या प्रकरणाशी संबंधित स्वयंस्पष्ट आदेश सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नितीन राऊत यांचे पत्र दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.

सत्तेच येताच शहराच्या सत्यानाश करणाऱ्या संस्थेचे पुनरुज्जीवन करणे हे महाआघाडीचे महापाप असल्याचे दटके म्हणाले. राऊत यांनी पत्र मागे घ्यावे, असे आवाहन करतानाच नासुप्र पुनरूज्जीवनाचे प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा दटके यांनी दिला.

महापौर संदीप जोशी यांनी नासुप्र शहरविकासाबाबत इच्छुक नसल्याचे सांगितले. मनपाने साडेतीन ते पावणेचार हजार पत्र दिल्यावर नासुप्रने केवळ 5 हजार 700 फायलीच दिल्या आहेत. नासुप्र हे कॉंग्रेससाठी भ्रष्टाचाराचे कुरण राहिले.

फडणवीसांनी ते बरखास्त केल्यानंतर पुनरुज्जीवित करण्याची मागणी दुर्दैवी आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे अहवाल सादर करताना तो प्रथम सभागृहात आणावा, त्याशिवाय तो शासनाला पाठवून नसे आसे पत्र मनपा प्रशासनाला दिले असल्याची माहिती महापौर जोशी यांनी दिली.