Published On : Thu, Aug 17th, 2017

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी संजय धोत्रेंचं नाव

मुंबई: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पदावरुन दूर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे संभाव्य प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे.

या संभाव्य नावांमध्ये अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

खासदार संजय धोत्रेंनी सलग तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून विजय नोंदवला आहे. तीनही वेळा त्यांनी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला.

रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी केल्यास राज्याची धुरा मराठा, ओबीसी समाजातील नेतृत्वाकडे देण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी मराठा, ओबीसी नेतृत्वाची चाचपणी केंद्रीय नेतृत्वाकडून सुरू आहे. त्याच अनुषंगानं प्रदेशाध्यक्ष पदासाठी खासदार संजय धोत्रे यांचे नाव चर्चेत आहे.


धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजपनं अकोल्यात विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू सहकारी म्हणून खासदार संजय धोत्रे यांची राजकीय पटलावर ओळख आहे.

त्यामुळे संजय धोत्रे यांच्या संभाव्य प्रदेशाध्यक्षपदाबद्दल अकोला जिल्ह्यात मोठी उत्सुकता दिसून येत आहे.