Published On : Thu, Nov 26th, 2020

संदीप जोशींचा विजय म्हणजे प्रामाणिक कार्याला न्याय : दयाशंकर तिवारी

केमिस्ट मित्र परिवार आणि विविध संघटनांच्या नागपुरात सभा

नागपूर : नागपूरचे महापौर पदवीधर मतदारसंघातील भाजपा-मित्र पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी दिली. आता त्यांचा विजय ही आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आणि नागरिकांची जबाबदारी आहे. आपल्या सहकार्याने त्यांचा विजय निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त करीत संदीप जोशींचा विजय म्हणजे प्रामाणिक कार्याला न्याय, असे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले.

Advertisement

नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजप-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ बजाज नगर येथील एका लॉनमध्ये केमिस्ट मित्र परिवारातर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. सभेला आमदार डॉ. परिणय फुके, महापौर संदीप जोशी, नगरसेवक प्रमोद तभाने, संजय बंगाले, सुनील हिरणवार, संजय वाधवानी, आशीष फडणवीस, अश्विन मेहाडिया, गिरीधर मंत्री, हरिश गणेशानी, मुकुंद दुबे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी म्हणाले, संदीप जोशी हे जेव्हा-जेव्हा निवडणूक लढले, त्यांच्या मतांचा आकडा वाढतच गेला. मागील नगरसेवकपदाच्या निवडणुकीत ते महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी विजयी होणारे नगरसेवक ठरले. त्यांची लोकप्रियता ही त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आहे. पीडित, वंचितांची सेवा करणे हा त्यांचा स्वभावगुण आहे. मदतीची याचना करणारा त्यांच्याकडून रीत्या हाताने परत जात नाही. म्हणूनच अल्पावधीत त्यांची स्वतंत्र ओळख त्यांच्या कार्याने तयार झाली. राजकारणाच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक कार्याला बळ देण्यासाठी, पदवीधरांचे, बेरोजगारांचे, शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी त्यांना विधानपरिषदेत बहुमताने पाठविणे हे आपले कर्तव्य आहे, ते आपण पार पाडू, असे आवाहन त्यांनी केले.

सभेला संबोधित करताना महापौर संदीप जोशी म्हणाले, आपल्या सर्वांच्या प्रेमापोटीच निवडणूक लढविण्याचा मी निर्धार केला. आपल्या सहकार्याने ह्या निवडणुकीत नक्की विजयी होईल, असा मला विश्वास आहे. आपण समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहात. त्यामुळे एका व्यक्तीने दहा व्यक्तींना मतदानाकरिता प्रेरीत करावे, प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूर पदवीधर मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचणे शक्य नाही. हे लक्षात घेता आपणच या निवडणुकीतील स्टार प्रचारक आहात, असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.

नागपुरात सायंकाळी विविध ठिकाणी प्रचार सभा पार पडल्या. शंकर नगर उद्यान, व्होकेशनल टिचर्स असोशिएशनतर्फे प्रताप नगर शाळा, नागपूर माजी सैनिक आघाडीच्या वतीने मनीषनगर पंचतारा सोसायटी, धनगर समाज पदवीधर संघटनेच्या वतीने स्वाती लॉन रिंग रोड, बंजारा समाजाच्या वतीने साऊथ पॉईंट स्कूल आणि पवार नगर येथील अप्सरा लॉन आदी ठिकाणी झालेल्या सभेत उपस्थित प्रमुख व्यक्ती, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी संदीप जोशी यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. नगरसेवक संजय बंगाले, अभय दीक्षित, संजय विसपुते, राम कोरेके, संदीप जाधव, अजय बोढारे यांच्यासह प्रत्येक सभेला मतदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement