Published On : Fri, Nov 22nd, 2019

संदीप जोशी यांची महापौरपदी निवड

मनिषा कोठे उपमहापौर : पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शुक्रवारी (ता. २२) झालेल्या विशेष निवडणूक सभेत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संदीप जोशी यांची नागपूर शहराचे ५३ वे महापौर म्हणून निवड झाली. तर भाजपच्याच नगरसेविका मनिषा कोठे यांची उपमहापौरपदी निवड झाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

Advertisement

नागपूर महानगरपालिकेच्या महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे सकाळी ११ वाजता विशेष सभेला सुरुवात झाली. महापौरपदासाठी भाजपच्या वतीने नगरसेवक संदीप जोशी यांनी तर उपमहापौर पदासाठी नगरसेविका मनिषा कोठे यांनी नामांकन अर्ज सादर केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने महापौर पदासाठी नगरसेविका हर्षला साबळे यांनी तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक तथा राकाँ पक्षनेते दुनेश्वर पेठे यांनी अर्ज सादर केला होता. बहुजन समाज पार्टीच्या वतीने मोहम्मद इब्रहिम यांनी तर नगरसेविका मंगला लांजेवार यांनी अनुक्रमे महापौर व उपमहापौरपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला होता.

पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी महापौरपदासाठी आलेले सर्व वैध असल्याचे सांगितले आणि अर्ज परत घेण्यासाठी अवधी दिला. अर्ज परत करण्याच्या कालावधीत कुणीही अर्ज परत घेतला नसल्याने महापौर पदासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. भाजपचे संदीप जोशी यांना १०४ मते मिळाली. काँग्रेस-राकाँ आघाडीच्या हर्षला साबळे यांना २६ तर बसपाचे मोहम्मद इब्राहीम यांना १० मते मिळाली. पीठासीन अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना विजयी घोषित केले.

यानंतर उपमहापौर पदासाठी प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. भाजपच्या वतीने नगरसेविका मनिषा कोठे, काँग्रेस-राकाँच्या वतीने दुनेश्वर पेठे आणि बसपाच्या वतीने मंगला लांजेवार यांचे अर्ज वैध ठरले. दिलेल्या अवधीत कुणीही अर्ज परत न घेतल्याने उपमहापौरपदासाठीही मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये भाजपच्या मनिषा कोठे यांना १०४, काँग्रेस-राकाँचे दुनेश्वर पेठे यांना २६ तर बसपाच्या मंगला लांजेवार यांना १० मते मिळाली. भाजपच्या मनिषा कोठे यांना पीठासीन अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विजयी घोषित केले.

विजयी उमेदवारांचे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

नागपूर महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचे पक्षनिहाय संख्याबळ भाजप १०६, काँग्रेसचे २९, बसपाचे १०, शिवसेनेचे दोन, राकाँचे एक तर अपक्ष असे आहे. दोन जागा रिक्त आहेत. यापैकी नगरसेवक सतीश होले यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. तर नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर प्रकृती अस्वास्थामुळे गैरहजर होते. शिवसेनेचे दोनही सदस्य किशोर कुमेरिया आणि मंगला गवरे गैरहजर होते. काँग्रेसचे रश्मी धुर्वे, जिनाश मुमताज मो.इरफान, बंटी शेळके आणि गार्गी चोपडा अनुपस्थित होते. अपक्ष नगरसेविका आभा पांडे ह्यासुद्धा अनुपस्थित होत्या. नियमानुसार मतदान प्रक्रियेत स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नव्हता.

मतदान प्रक्रियेदरम्यान मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांची उपस्थिती होती. आमदार गिरीश व्यास, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मावळत्या महापौर नंदा जिचकार, मावळते उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, सभागृह नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, माजी महापौर अर्चना डेहनकर व अन्य पदाधिकारी व नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवून नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनिषा कोठे यांचे स्वागत आणि अभिनंदन केले. यानंतर महालमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement