नागपुर : समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अथवा महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भैय्याजी खैरकर यांनी अलिकडेच एका पत्रपरिषदेत केली आहे. समृद्धी महामार्ग विदर्भातून सुरू होऊन मराठवाडा मार्गे मुंबईला जाणार आहे. अशा स्थितीत विदर्भ आणि मराठवाड्याला लुटून मुंबईला समृद्ध करणाऱ्यांचे नाव समृद्धी महामार्गाला कसे काय देण्यात येत आहे?, असा प्रश्न खैरकर यांनी उपस्थित केला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाला महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा केली. हा मार्ग निम्म्यावरही आला नसला तरी आतापासूनच मार्गाच्या नावावरून नवा वाद पेटण्याची चिन्हे दिस लागली आहे. खैरकर यांच्या मते, पितृप्रेम हे सर्वांपेक्षा मोठे असल्याचे शिवसेनेने सिद्ध केले आहे. जागतिक बँकेचे कर्ज घेऊन देशात महामार्ग तयार झाले. त्यामुळे आजपर्यंत भारतीय जनतेला कोणताही फायदा झाला नाही. उलट जगभरातल्या व्यापाऱ्यांचे उत्पादन खेड्यात पोहोचले. सामान्य माणूस मात्र, कर्जबाजारीच राहिला याविषयी खैरकर यांनी खंत व्यक्त केली आहे.