नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयातील सूत्रांनी ही माहिती दिली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
सज्जन कुमार हे १९८४ च्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये दोषी ठरले होते आणि तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. २०१८ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने पालम कॉलनीतील पाच शीखांच्या हत्येप्रकरणी त्यांची आधीची निर्दोष मुक्तता उलटवत त्यांना जन्मठेप सुनावली होती.
१९८४ दंगलीतील प्रकरणात जन्मठेप-
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी हिंसाचाराशी सज्जन कुमार यांचे नाव जोडले गेले. पालम कॉलनीतील राजनगर परिसरातील पाच जणांच्या हत्या आणि गुरुद्वारा जाळल्याच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते.
या प्रकरणात सुरुवातीला कनिष्ठ न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, त्याविरोधातील अपीलावर दिल्ली उच्च न्यायालयाने १७ डिसेंबर २०१८ रोजी निर्णय देत सज्जन कुमार यांना जन्मठेप सुनावली.
२०२५ मध्ये आणखी एका प्रकरणात दोषी-
सज्जन कुमार यांना २०२५ मध्ये १९८४ च्या दंगलीशी संबंधित आणखी एका हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. राऊज अव्हेन्यू न्यायालयाने जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांच्या हत्येप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
या प्रकरणामुळे सज्जन कुमार यांच्यावर दोन वेगवेगळ्या १९८४ दंगल प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा कायम होती.
एका प्रकरणात मात्र निर्दोष मुक्तता-
दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये दिल्लीतील न्यायालयाने जनकपुरी आणि विकासपुरी परिसरातील १९८४ च्या हिंसाचाराशी संबंधित एका प्रकरणात सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली होती. पुरावे संशयाच्या पलीकडे दोष सिद्ध करण्यासाठी पुरेसे नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
मात्र, या निर्दोष मुक्ततेनंतरही इतर दोन प्रकरणांतील जन्मठेपेच्या शिक्षेमुळे त्यांची तुरुंगातून सुटका झाली नव्हती.
सफदरजंग रुग्णालयात आणले, मात्र…
गुरुवारी प्रकृती बिघडल्यानंतर सज्जन कुमार यांना सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली.




