नागपूर : नागपूर शहराचा सतत वाढणारा विस्तार, लोकसंख्येचा झपाट्याने होणारा विकास आणि त्यासोबतच वाढणारे गुन्हेगारीचे प्रकार लक्षात घेता राज्य शासनाच्या गृह विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयात सहाव्या पोलीस परिमंडळाची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळताना पोलीस यंत्रणेला मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्याचे पाचवे परिमंडळ विभाजित करून हे नवीन सहावे परिमंडळ तयार करण्यात येणार आहे. कळमना आणि पारडी परिसर हे या नव्या परिमंडळाचे मुख्य केंद्र असतील. नागपूरच्या झपाट्याने होत असलेल्या विस्तारामध्ये या भागांमध्ये झोपडपट्ट्यांचे प्रमाण, नागरी प्रश्न आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत वाढती मागणी पाहता, नवीन परिमंडळाची गरज असल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
या नव्या परिमंडळासाठी एक पोलीस उपायुक्त आणि दोन सहायक पोलीस उपायुक्त पदांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच, या परिमंडळासाठी ४२.१३ लाख रुपयांचा आवर्ती आणि ४०.९२ लाख रुपयांचा अनावर्ती खर्च मंजूर करण्यात आला आहे.
सहावे परिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर, कळमना आणि पारडीसारख्या वाढत्या नागरी वसाहतींमध्ये पोलीस यंत्रणा अधिक परिणामकारक पद्धतीने काम करू शकणार आहे. भविष्यात या विभागात नवीन पोलीस ठाण्यांचा समावेश होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
हा निर्णय नागपूर शहरातील वाढती गुन्हेगारी आणि प्रशासकीय दबाव यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असा विश्वास प्रशासनातून व्यक्त करण्यात येत आहे.