Published On : Sat, Jun 2nd, 2018

सुभाष देशमुखांची हकालपट्टी कराः सचिन सावंत

Advertisement

Sachin Sawant
मुंबई: राज्याच्या सहकार मंत्र्यांनी आरक्षित जागेवर अनधिकृतपणे बांधलेला अलिशान बंगला हा फडणवीस सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे ज्वलंत प्रतिक आहे. सातत्याने बेफामपणे वर्तणूक करून सेबी सारख्या यंत्रणांनी दोषी ठरवूनही मंत्रीमंडळात कायम असलेल्या सुभाष देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की अनधिकृत बांधकाम करणा-या नगरपालिका सदस्यांचेही सदस्यत्व रद्द होते. परंतु राज्याच्या मंत्र्यावर कारवाई होत नाही असे विरोधाभासी आणि दुर्देवी चित्र महाराष्ट्रात पहायला मिळते आहे. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले अनेक कुख्यात मंत्री राज्याच्या सरकारमध्ये आहेत. पण मुख्यमंत्री त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालून त्यांना प्रख्यात दर्शवण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. भाजप सरकारने कमरेचे काढून डोक्याला गुंडाळलेले असून मुख्यमंत्री क्लीन चिटच्या चिंध्यांनी लज्जारक्षण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करित आहेत अशी घणाघाती टीका सावंत यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी अनधिकृत बांधकाम करणा-या बिल्डरांवर मोक्का कायद्याखाली कारवाई करणार असे जाहीर केले होते. आता त्यांनी सुभाष देशमुखांवर मोक्का लावावा अशी मागणी सावंत यांनी केली. राज्याचे नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असताना सदर अनधिकृत बांधकाम प्रकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांना निश्चितच होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाई केली नाही. न्यायालयात गेल्यामुळेच हे प्रकरण प्रकाशात आले. यातूनच राज्यातले सरकार हे पारदर्शक नाही तर भ्रष्टाचारी आहे हे दिसून येते असे सावंत म्हणाले.