Published On : Fri, Mar 17th, 2017

आफरीन प्रकरणी शिवसेना आफरीनच्या पाठिशी: उद्धव ठाकरे

Advertisement

Mumbai: नाहीद आफरीन या प्रकरणी शिवसेना आफरीनच्या पाठिशी असून आता समाजानंही तिच्या पाठिशी उभं राहून ही लढाई आफरीनची एकटीची नसून सर्वांनी तिच्या पाठिशी उभं राहावं असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पद्मवतीचा सेट तोडल्यावर बोलणारे आफरीन प्रकरणी मात्र तोंडाला बूच लावून आहेत. अशी टीकाही त्यांनी केली आहे.

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या संपादकीयमध्ये उद्धव ठाकरेंनी आफरीनच्या धैर्याचं कौतुक केलं आहे, तर बॉलिवूडवर जोरदार प्रहार केला आहे. जेव्हा आफरीनविरोधात फतवा काढण्यात येतो तेव्हा बॉलिवूडचे खान मंडळी कुठं असतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आफरिन प्रकरणी उद्धव ठाकरे स्पष्ट करतात की फतवा आणि बुरखा यामुळे मुस्लिम महिलांचे जीवन अंधकारमय झाले आहे. आता या सर्व अत्याचाराविरोधात मुस्लिम महिलांच्या मनात असंतोषाची आणि लढ्याची ठिणगी पेटली आहे. नाहीद आफरीनने तेच करून दाखवले आहे. नाहीद आफरीनची लढाई एकाकी नाही हे समाजाने दाखवून देण्याची गरज आहे. मुस्लिमांसह समाजातील सर्वच धर्मीय लोकांनी आफरीनची लढाई ही स्वतःची लढाई मानायला हवी. शिवसेना तर तिच्याबरोबर आहेच. कारण आमच्यासाठी हे राजकारण नसून समाजकारण आणि राष्ट्रकारण आहे!

पाकिस्तान हा दहशतवादाचा कारखाना आहे व हा कारखाना उद्ध्वस्त झाल्याशिवाय जगात शांतता नांदणार नाही. पाकिस्तानी दहशतवादाच्या झळा हिंदुस्थानलाही बसतात. आता तर संयुक्त राष्ट्रामध्येही हिंदुस्थानने ‘पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा कारखाना बनला आहे. त्या ठिकाणी अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांमध्येही वाढ झाली आहे,’ अशा शब्दांत तक्रार केली आहे. अर्थात त्यामुळे पाकिस्तानचे दहशतवादी शेपूट सरळ होईल असे नाही. जसे पाकड्यांचे हे दहशतवादप्रेम कमी होत नाही तसे आमच्या देशातील मुल्ला-मौलवींचे ‘फतवाप्रेम’ही कमी झालेले नाही.

आपला देश भले एकविसाव्या शतकात वगैरे पोहोचला असेल, पण धर्मांध मुल्ला आणि मौलवी मात्र आजही मध्यकालीन युगात जगत आहेत. हा एक मानसिक रोग असून आसामची नवोदित गायिका नाहीद आफरीन हिला याच विकृतीची किंमत सध्या मोजावी लागत आहे. तिच्याविरुद्ध आसाममधील 46 मौलवींनी फतवा जारी करून तिला स्टेजवर गाणे गाण्यास मनाई केल्याचे प्रकरण सध्या गाजते आहे. अर्थात, नाहीद आफरीन हिने फतव्याच्या दहशतीची पर्वा न करता बंडाची भाषा केली आहे. ‘मी गायिका आहे, संगीत हेच माझे जीवन आहे. सूर आणि स्वरांशिवाय मी जगू शकत नाही. अल्लाने मला हा आवाज गाण्यासाठीच दिला आहे. जर मी गाऊ शकली नाही तर मी मरून जाईन…’ अशा भावना नाहीद आफरीनने व्यक्त केल्या आहेत. आफरीन हिने हे

दाखवले त्याचे कौतुकच करायला हवे. अर्थात हा विषय फक्त तिचे कौतुक करण्यापुरता मर्यादित नसून तिच्या धाडसाला समाजाच्या सर्वच घटकांनी बळ देण्याचा आहे. खुद्द पाकिस्तानातही मौलवींच्या ‘फतवे’शाहींविरुद्ध महिलांनी बंड केलेच आहे. मलाला या शाळकरी मुलीने दहशतवाद्यांच्या गोळय़ा झेलून फतवेशाहीविरोधातील स्वातंत्र्याच्या लढाईचा अग्नी पेटता ठेवला आहे. पाकिस्तानसारख्या इस्लामी राष्ट्रात महिला सिनेमा आणि रंगमंचावर काम करीत आहेत. मग पाकिस्तान आणि इतर इस्लामी देशांमध्ये जर धर्मांधांचे फतवे कुचकामी ठरत आहेत तर आसाममधील हे ४६ मौलवी फतव्याची फडफड का करीत आहेत? मुळात फतवा आणि बुरखा यामुळे मुस्लिम महिलांचे जीवन अंधकारमय झाले आहे. ‘तिहेरी तलाक’ने मुस्लिम स्त्रीला गुलाम, बेसहारा बनवले आहे. आता या सर्व अत्याचाराविरोधात मुस्लिम महिलांच्या मनात असंतोषाची आणि लढ्याची ठिणगी पेटली आहे. त्याचे भान फतवेबाज मुल्ला-मौलवींनी ठेवले नाही तर त्यांच्या दाढीला हात घालण्याचे बळ या महिलांच्या मनगटात नक्कीच येईल. नाहीद आफरीनने तेच करून दाखवले आहे. फतव्याला न घाबरता तिने पुढे जाण्याची हिंमत दाखवली आहे. काल आम्ही याच स्तंभात मुस्लिमांच्या फतवेगिरीविरुद्ध सविस्तर भाष्य केलेच होते. मात्र आता नाहीद आफरीनने फतव्याविरोधात जी लढाई पुकारली आहे त्या लढाईला बळ देण्याची वेळ आहे. शिवसेनेसह सर्वच राष्ट्रवादी नागरिक या लढाईत आफरीनसोबत राहतीलच, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते एरवी अभिव्यक्तिस्वातंत्र्य, असहिष्णुता वगैरेंबद्दल घसे फोडणाऱ्या मंडळींनी याप्रकरणी स्वीकारलेल्या सोयिस्कर मौनाचे.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरेंसाठी छाती पिटणाऱयांत तुमचे ते बॉलीवूडवालेही एरवी आघाडीवर असतात, मग आफरीनवर होत असलेल्या अन्यायाबाबत त्या बॉलीवूडवाल्यांच्या नरडय़ास आता बूच का लागले आहे? संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’ चित्रपटातील महिला विटंबनेच्या विरोधात ज्यांनी आवाज उठवला त्यांच्या विरोधात काहींनी थेट संसदेत प्रश्न विचारले, मात्र त्यांनाही नाहीद आफरीनच्या बाजूने उभे राहावे असे वाटले नाही. पाकिस्तानातील कलाकारांना हिंदुस्थानात रोखणे हे दहशतवादी कृत्य आहे असे ज्यांना वाटते त्यांनी आफरीनच्या गाण्याविरोधात फतवे जारी करणाऱ्यांचा साधा निषेधही केलेला नाही. महेश भट, जया बच्चन अशांनी तर नाहीदच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून फतव्यांचा धिक्कार केला पाहिजे.

हिंदुस्थानात गुदमरण्यापेक्षा देश सोडलेला बरा असे मध्यंतरी आमीर खान व त्याच्या पत्नीला वाटत होते. आफरीनच्या गुदमरण्यावर मात्र सगळय़ाच खानांची बोलती बंद झाली आहे. हे धक्कादायक आहे. नाहीद आफरीनची लढाई एकाकी नाही हे समाजाने दाखवून देण्याची गरज आहे. मुस्लिमांसह समाजातील सर्वच धर्मीय लोकांनी आफरीनची लढाई ही स्वतःची लढाई मानायला हवी. शिवसेना तर तिच्याबरोबर आहेच. कारण आमच्यासाठी हे राजकारण नसून समाजकारण आणि राष्ट्रकारण आहे!