
नागपूर : नागपूर प्रेस क्लब, सिव्हिल लाइन्स येथे शनिवारी सायंकाळी एक संस्मरणीय सोहळा पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक श्री एस. एन. विनोद यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ व ‘स्मारिका’ प्रकाशन सोहळ्याने पत्रकारितेच्या क्षेत्रातील सुवर्ण क्षण पुन्हा उजळले.
या प्रसंगी बोलताना गडकरी यांनी लोकमत समाचारच्या प्रारंभकाळातील आपल्या आणि विनोदजींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी विनोदजींच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाचे कौतुक करत “त्यांनी नेहमीच जनतेच्या प्रश्नांवर निर्भीडपणे लेखणी चालवली,” असे सांगितले.एस.एन. विनोद पत्रकारिता क्षेत्रातील निडरतेचा आदर्श, असल्याचे ते म्हणाले.यानंतर गडकरींनी विनोदजींना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छाही दिल्या.
‘एस. एन. विनोद : ८५ सालों की अनंत यात्रा’ या नावाच्या प्रकाशित स्मारिकेत विनोदजींच्या सहा दशकांहून अधिक काळाच्या पत्रकारितेच्या प्रवासाचा प्रेरणादायी आढावा घेतला आहे.
प्रेस क्लब अध्यक्ष प्रदीप मैत्रा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, एस. एन. विनोद हे केवळ पत्रकार नव्हेत तर अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या निर्भय लेखनशैलीने आजच्या तरुण पत्रकारांना प्रेरणा दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी देखील विनोदजींच्या कार्याचा गौरव करताना म्हटले, सत्यासाठी झटणारी त्यांची वृत्ती ही भारतीय पत्रकारितेची ओळख आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वरिष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांनी भूषवले. आजही विनोदजी यांच्याकडे आम्ही आदर भावाने बघतो.या देशात परिवर्तन घडवून आणण्यात यांच्यासारख्या निर्भीड पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचेच गांधी म्हणाले.
यादरम्यान संपूर्ण सभागृहात एका पत्रकाराच्या अद्वितीय प्रवासाला दिलेला हा सन्मान खरोखरच अविस्मरणीय ठरला.










